पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. इंदापूर शहरातील एका चौकात त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला. पाटील यांच्या सरकारी वाहनावर हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात पोर्श कारने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. त्यानंतर इंदापूरात थेट तहसीलदारांवरच गंभीर हल्ला झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट टाकून खोचक टीका केली आहे.

‘दुष्काळ आढावा बैठकीला मराठवाड्याचेच मंत्री गैरहजर’; शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी याची..”

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. यासाठी त्यांच्याच एका जुन्या विधानाचा दाखल रोहित पवार यांनी दिला. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असे विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य?”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रोहित पवार पुढे म्हणाले, पण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता. आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या!”

तहसीलदार श्रीकांत पाटील काय म्हणाले?

हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, मी नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय भवनाकडे निघालो होतो. शहरातील संविधान चौकात माझी गाडी आली असता काही जणांनी माझ्या गाडीवर हल्ला चढविला. हल्लोखोरांनी लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडल्या. तसेच माझ्या आणि चालकाच्या अंगावर, डोळ्यात मिरचीची पूड फेकली. आम्ही हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आणखी दोन-तीन हल्लेखोर समोरच्या एका गाडीतून आमच्या दिशेने हल्ला करण्यासाठी आले.

दरम्यान, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. “इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टद्वारे केली.