अणुऊर्जा महामंडळातर्फे  प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रतिकृतीचे असंख्य  फुगे आज बालदिनाच्या निमित्ताने (१४ नोव्हेंबर) प्रकल्प परिसरात सोडून विरोध व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पाच्या विरोधात नव्याने स्थापन झालेल्या जनहक्क समितीतर्फे आयोजित या पहिल्याच अभिनव उपक्रमामध्ये प्रकल्पाच्या प्रतिकृतीचे एक हजार फुगे आज सकाळी साखरीनाटे येथे सोडण्यात आले. प्रस्तावित प्रकल्पामुळे बालकांवर होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी हवेत सोडलेल्या या फुग्यांना पोस्टकार्ड जोडण्यात आले आहे. हवेतून सोडलेला फुगा आपल्यापर्यंत पोचतो तर नियोजित प्रकल्पाद्वारे होणारे प्रदूषण पोहोचेल की नाही, असा प्रश्न या कार्डावर विचारण्यात आला आहे. हे फुगे जेथे जाऊन पडतील तेथील रहिवाशांनी त्यावर आपले नाव-पत्ता लिहून कार्ड पुन्हा पोस्टात टाकायचे आहे. समितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, सचिव दीपक नागले, प्रदीप इंदुलकर, प्रा. सदानंद मोरे, मच्छीमार नेते अमजद बोरकर इत्यादी मान्यवरांसह परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार या प्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केलेल्या प्रवीण गवाणकर यांच्या नेतृत्वाखालील माडबन जनहित सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकसानभरपाई स्वीकारून समझोता केल्यामुळे त्यांची जागा वाघधरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जनहक्क समितीने घेतली आहे. त्यानंतर समितीचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balloon flown in against jaitapur nuclear power project
First published on: 15-11-2013 at 01:58 IST