POP Ganesh Idol: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असल्यामुळे राज्य शासनाने पीओपी मूर्ती बनविणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास बंदी घातली. या निकालानंतर १ जानेवारी २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेने पीओपीच्या मूर्ती खाडी किंवा समुद्रात विसर्जित करण्यास बंदी घातल्याचे आदेश काढले. मात्र या निर्णयाचा मूर्तिकार आणि भाविक जोरदार विरोध करत आहेत. मुंबई, ठाण्यातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सणांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असल्याची लक्षवेधी सूचना विधानसभेत आज उपस्थित करण्यात आली होती. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पकंजा मुंडे यांनी लक्षवेधीला उत्तर दिले.

आमदार चंद्रकांत नवघरे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. या बंदीविरोधात मूर्तिकार यांनी नाराजी व्यक्त केली असून राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ते आक्रमक झाले आहेत. हा निर्णय घेत असताना मूर्तिकारांची मते, सूचना विचारात न घेतल्यामुळे घोळ झाल्याची बाब मूर्तिकारांनी मांडली आहे. पीओपी मूर्तीमुळे पर्यावरणाचा खरच ऱ्हास होतो का? याचाही वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास होण्याची गरज आहे, असेही मूर्तिकार यांनी सुचविले असल्याचे लक्षवेधीत म्हटले.

तसेच पीओपीला पर्याय म्हणून शाडूची मूर्ती घडविणे खूप कठीण आणि खर्चिक आहे. जर पीओपीवर सरसकट बंदी घातल्यास राज्यातील अनेक मूर्तिकारांवर उपासमारीची आणि बेरोजगारीची वेळ येईल, अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना विधानसभेत उपस्थित करण्यात आली.

मंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना म्हटले की, मूर्तिकारांच्या उद्योगावर गदा न येता, पर्यावरणाचेही नुकसान होणार नाही, याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे. २१ जानेवारी २०२५ रोजी एक बैठक घेऊन या विषयाची विस्तृत चर्चा करण्यात आली. पीओपीच्या मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, असेही काही संस्थांचे म्हणणे आहे. या संस्थांनी दिलेली कारणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविली जातील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाची मदत घेणार

भाजपाचे नेते, मंत्री आशिष शेलार यांनी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांची भेट घेतल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. पीओपीच्या मूर्ती पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्याची विनंती आयोगाला करण्यात आली आहे. त्यानुसार एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला असून त्याच्या निष्कर्षानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच हे निष्कर्ष केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळासमोर मांडले जातील, असेही त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्नशील

पीओपीमुळे प्रदूषण होते की, त्यावर लावलेल्या रंगामुळे प्रदूषण होते? याचाही शासन स्तरावर विचार केला जात आहे. शासनाने यासाठी विविध बैठका घेतल्या आहेत. तसेच याबद्दलची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवली असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. दरम्यान कृत्रिम तलावात पीओपीच्या मूर्ती विसर्जित करण्याची परवानगी मिळावी, यासाठी केंद्रीय नियंत्रण मंडळाला विनंती करणार असल्याचे सांगितले.