धाराशिव : एका खाजगी इमारतीचा भाडेकरार संपूनही नव्याने भाडेकरार करण्यास टाळाटाळ केली म्हणून शहरातील एका बँकेवर शनिवारी (ता. ६) फसवणुकीचा गुन्हा आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र भाडेकरार अद्याप संपलेला नाही. त्यास आणखी पाच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. उलट सार्वजनिक बँकेचा पाणीपुरवठा आणि पार्किंग बंद करून बँकेच्या ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न संबंधित इमारत मालक मागील दोन महिन्यांपासून करत असल्याचे बँक व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

येथील रणजित तुकाराम समुद्रे यांच्या इमारतीत मागील सहा वर्षांपासून कॅनरा बँकेची शाखा कार्यरत आहे. सहा वर्षपूर्वी पाच वर्षांच्या भाडे करारावर ही बँक ज्ञानेश्वर मंदिराजवळील समुद्रे यांच्या इमारतीत कार्यरत आहे. हा भाडे करार संपुष्टात येऊन जवळपास एक वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता नवीन भाडे करार करण्यास सांगूनही संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांनी अद्याप भाडेकरार केला नसल्याचे समुद्रे यांचे म्हणणे आहे. विश्वासाने दिलेल्या जागेचा नविन भाडे करार न करता बँकेच्या व्यवस्थापकांनी विश्वासघात करुन फसणुक केली आहे. अतिक्रमण करुन इमारत वापरत आहेत. आशा आशयाची तक्रार समुद्रे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून ४२०, ४०६, ४४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी… कुठे आणि कधी असणार सुट्टी?

मात्र २०१८ साली केलेला भाडे करार दहा वर्षासाठी केलेला आहे. अद्याप आणखी पाच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. केलेल्या भाडेकरारात पहिली पाच वर्षे संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पाच वर्षांसाठी वाढीव भाड्याची तरतूद आहे. मात्र संबंधित इमारत मालकाच्या हेकोखोरपणामुळे बँक व्यवस्थापन अडचणींस तोंड देत आहे. दहा वर्षांचा भाडेकरार असतानाही, पाच वर्षातच नव्याने भाडेकरार करण्याचा त्यांचा बेकायदेशीर आग्रह आहे. त्यांनी मागील दोन महिन्यांपासून बँकेचा पाणीपुरवठा आणि पार्किंगही बंद केली आहे. परिणामी बँकेच्या ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे बँक व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

दरम्यान पोलिसांनी बँके विरोधात गुन्हा दाखल करताना भाडेकरार पहिला आहे की नाही. हा प्रश्न बँक व्यवस्थापणेच्या म्हणण्यावरून समोर आला आहे. असे असेल तर वैयक्तिक हितासंबंधातून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे का हे पाहणे उचित ठरणार आहे.

आणखी वाचा-मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज

काय आहे दाखल गुन्हा

येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकांनी पाच वर्षाचा भाडेकरार केलेला आहे. हा करार संपुष्टात आलेला आहे. तरीही अतिक्रमण करून बँक इमारतीत कार्यरत आहे. विश्वासाने दिलेल्या जागेचा नविन करार न करता बॅक व्यवस्थापनाने विश्वासघात, फसणुक केली आहे. अतिक्रमण केले आहे.

करार पाच नव्हे तर दहा वर्षांचा आहे. संबंधितांनी पोलिसांना चुकीची माहिती दिली आहे. उलट या सार्वजनिक बँकेचा पाणीपुरवठा आणि पार्किंग व्यवस्था इमारत मालकाने मागील दोन महिन्यांपासून बंद केली आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांसह कर्मचाऱ्यांना अडी-अडचणींस तोंड द्यावे लागत आहे. -नीरज पौळ, व्यवस्थापक, कॅनरा बँक, धाराशिव.