शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्जे उचलण्याचे प्रकरण
परभणी जिल्ह्य़ात गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जीच्या माध्यमातून हजारो शेतक ऱ्यांच्या नावे परस्पर कोटय़वधींचे कर्ज उचलल्याप्रकरणी कारखान्याचे सर्वेसर्वा रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अशाच स्वरूपाची कारवाई कराडच्या कृष्णा साखर कारखान्यावरही झाली होती. सोलापूर व शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने असेच प्रकार केल्याचे यापूर्वी उजेडात आले होते. मात्र त्यावर अद्यापि कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याच ‘लोकमंगल’ची री ओढलेल्या गंगाखेड शुगर्स व कृष्णा कारखान्याला एक न्याय आणि लोकमंगल साखर कारखान्यातील कर्ज घोटाळाप्रकरणी सहकारमंत्री देशमुख यांना दुसरा न्याय कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
गंगाखेड शुगर्सने बँकांशी संगनमत करून हजारो शेतक ऱ्यांच्या नावे सुमारे ३२८ कोटींचे कर्ज उचलल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर या प्रकरणी या कारखान्याचे सर्वेसर्वा असलेले रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित बँकांतील अधिकाऱ्यांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इकडे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल शुगर्सने देखील यापूर्वी अशाच प्रकारे ऊसवाहतूक ठेकेदार व शेतक ऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलले होते. यात संबंधित बँकाशी संगनमत करण्यात आले होते. जेव्हा संबंधित शेतक ऱ्यांनी वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी संबंधित बँकांकडे संपर्क साधला, त्या वेळी त्या शेतक ऱ्यांच्या नावे लोकमंगल शुगर्सने अगोदरच कर्ज उचलल्याची धक्कादायक प्रकरणे उघडकीस आली होती. या संदर्भात आक्षेप घेणाऱ्या संबंधित शेतक ऱ्यांचे कर्ज लगेचच लोकमंगल शुगर्सने भरून टाकले होते. सोलापुरात कॅनरा बँकेकडून अशा पद्धतीने लोकमंगल शुगर्सने कर्जे उचलली होती. त्या वेळी लोकमंगल शुगर्सचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देताना, ही नियमित बाब असल्याचे म्हटले होते.
या पाश्र्वभूमीवर लोकमंगल शुगर्सविरुद्ध अद्यापि कोणतीही कारवाई झाली नाही. तर दुसरीकडे अशाच स्वरूपाची कर्जे शेतक ऱ्यांच्या नावे परस्पर उचलल्याप्रकरणी परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड शुगर्सवर मात्र फौजदारी कारवाईला तोंड द्यावे लागले. तसेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यानेही अशाच स्वरूपाची ऊसवाहतूक ठेकेदार व शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोटय़वधींची कर्जे बँक ऑफ इंडियाकडून उचलल्याच्या प्रकरणी ‘कृष्णा’ च्या तत्कालीन संचालकांसह संबंधित ३० जणांविरुद्ध फौजदारी खटला दाखल झाला होता. ऊस वाहतूकदार व शेतक ऱ्यांच्या नावे परस्पर कर्जे उचलण्याचा प्रकार एकाच स्वरूपाचा असूनही एका प्रकरणात फौजदारी कारवाई आणि दुसऱ्या प्रकरणात संबंधित मोकळे कसे, याबाबत प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते. ‘लोकमंगल’ने आपल्या नावे परस्पर १५ लाखांचे कर्ज घेतल्याबाबत कल्याणराव मेंदगुडले (रा. येळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांनी पोलिसांत गेल्या एप्रिलमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर अद्यापि कारवाई न झाली नाही. याकडे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. एस. वीरेश प्रभू यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, तक्रारदाराला आपणास भेटायला सांगा, त्याची निश्चित दखल घेऊ, असे नमूद केले.
दोष आढळला नाही – देशमुख
याबाबत लोकमंगल शुगर्सचे अध्वर्यू तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘लोकमंगल’विरुद्ध असा कोणताही आक्षेपार्ह प्रकार शाबित झाला नसल्याचा दावा केला. कोणताही गुन्हा सकृतदर्शनी समोर आला नसताना व कोणीही तक्रार केलेली नसताना तसेच संस्थेच्या लेखापरीक्षणातही दोष आढळले नसताना कारवाई होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा निर्वाळा देशमुख यांनी दिला आहे.