मुंबईतील डान्सबारवर बंदी घालणाऱ्या आर आर. पाटील यांच्या अंजनी गावातच रविवारी रात्री उशिरापर्यंत सराटमधील तालावर बारबालांच्या पदन्यासावर तरूणाई िझगली. एका वरातीसमोर बारबालांनी केलेल्या या पदन्यासात अर्धे गाव रात्रभर झिंगले होते. मात्र याबाबत संबंधित वरपक्षाने हा सांस्कृतिक कार्यक्रम होता, असे सांगत बारबाला नाचल्या नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

बारबालांच्या नादामुळे तरूणाई वाया जात असल्याचे सांगत आघाडी शासनातील तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘डान्सबार’ बंदी लागू केली होती. या एका निर्णयामुळे आर.आर. पाटील महाराष्ट्राच्या घरा-घरात पोचले होते. पुढे ही ‘डान्सबार बंदी’ न्यायालयामार्फत हटविण्यात आली असली तरी त्यावर विविध अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र याच बारबालांचा ‘डान्स’ रविवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत आबांच्याच अंजनी गावात सुरू राहिल्याने आज हा सर्वत्र चर्चेचा विषय होता.

तासगाव तालुक्यातील अंजनी या चार हजार लोकवस्तीच्या गावात रविवारी एका प्रतिष्ठित तरूणाचा विवाह पार पडला. लग्नानंतर रात्री वधू-वराची सवाद्य वरात काढण्यात आली होती. या वरातीपुढे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सातारा, पनवेल, कराड आदी ठिकाणांहून नíतकांना पाचारण करण्यात आले होते. रात्री दहा नंतर सार्वजनिक ठिकाणी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणे कायद्याने निषिध्द असताना मध्यरात्रीनंतरही हे नाचकाम सुरू होते. तसेच गावातील तरुणाईदेखील त्यावर थिरकत होती.

याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता, हा प्रकार संबंधितांनी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आयोजित केला असल्याचे सांगितले. बारबालांचा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नव्हता, मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.