सोलापूर : बार्शी शहरात ओढ्याच्या कडेला रस्त्यावर बसून गप्पा मारताना पहाटे एक वाजता एका अल्पवयीन मुलीस धमकावत तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संदीप मोहन लंकेश्वर (वय ३२, रा. बार्शी) यास बार्शीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र असे दोघे ओढ्याच्या कडेला रस्त्यावर पहाटे १.१० वाजता गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी संदीप लंकेश्वर हा तेथे गेला. प्रथम त्याने पीडित अल्पवयीन मुलीच्या मित्रास ढकलून देत हुसकावून लावले. नंतर त्याने पीडित मुलीस धमकावत, तिचे तोंड दाबले. तुझे लफडे घरी जाऊन सांगतो, अशी धमकी देत, तिच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन त्याने तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या मित्राने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषणापासून बालकाचे संरक्षण, तसेच मारहाण आणि धमकावल्याच्या आरोपावरून संदीप लंकेश्वर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे आणि उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांनी गुन्ह्याचा तपास केला. यात सरकारतर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख व ॲड. प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.