गेली अनेक वष्रे सत्तेचा केंद्रिबदू लातूर व नांदेडमध्येच आलटून पालटून राहायचा. भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर मराठवाडय़ातील हा केंद्रिबदू आता बीडकडे सरकला असल्यामुळे लोकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण हे प्रभावी नेते नांदेड व लातूरचे वर्चस्व राज्य व देशपातळीवर टिकवून होते. सतत सत्तेच्या प्रभावाखाली हे जिल्हे असल्यामुळे कोणतीही अडचण या जिल्हय़ातील मंडळींना कधी वाटली नाही. २००९च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लातूर व नांदेड जिल्हय़ाला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. विलासराव देशमुख केंद्रात मंत्री असल्यामुळे तेव्हा फारशी अडचण लोकांना वाटली नाही. मात्र विलासरावांच्या निधनानंतर लातूरचा विकास खुंटणार याची खूणगाठ येथील जनतेने मनाशी पक्की बांधली होती.
राज्याचे पुढचे नेतृत्व आमदार अमित देशमुख यांच्याच हाती राहणार आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून लातूरकरांच्या कोपराला गूळ लावला. प्रत्यक्षात साधे राज्यमंत्रिपदही लातूरकरांच्या वाटय़ाला येऊ दिले नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात विलासराव देशमुख यांच्याकडे काहीकाळ असलेले ग्रामविकास मंत्रालय मिळाले हा एक योगायोग मानण्यात लातूरकरांना समाधान मानावे लागते आहे. दुसरा योगायोग असा, की २६ मे हा विलासरावांचा जन्मदिवस. त्याच दिवशी त्यांचे सख्खे मित्र गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले व तेही विलासरावांचेच खाते. आगामी काळात लातूरकरांना या योगायोगावरच समाधान मानावे लागणार आहे.