स्वानंद पाटील, बीड

बीड : राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकाविरुद्ध ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणात बीड जिल्हा कारागृहात असलेले चंदुलाल बियाणी यांच्यावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला. बियाणी यांच्यासह पतसंस्थेच्या ११ संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सतीश पोकळे यांनी याबाबतचा अर्ज परळी शहर पोलीस ठाण्यात १९ जुलै रोजी दिला होता त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल केला गेला.

परळी येथे मुख्य कार्यालय असलेल्या राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या १७७२ ठेवीदारांची १३ कोटी २६ लाख ८६ हजार २३१ रुपयांचा अपहार करून रकमेची फसवणूक केल्या बाबतची त्रुटी लेखापरीक्षणात आढळून आली होती.त्यानंतर बीड येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक सतीश पोकळे यांच्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या तत्कालीन ११ संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चंदुलाल बियाणी, बद्रीनारायण बाहेती, अभय कुमार वाकेकर आणि इतर आठ संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अजित पवार यांच्या सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ६ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या बैठकीत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावले होते. यावेळी त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता ठेवीदारांना ठेवी मिळाल्या पाहिजेत अशा सूचना केल्या होत्या.