Ayodhya Ram Temple Beed Crime news : बीडमधील एका तरूणाला अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासंबंधी मेसेज आल्याचा प्रकार समोर आला आहे. मंदिर उडवून देण्याच्या कटात सहभागी होण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर संबंधित तरूणाला दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर घाबरलेल्या तरूणाने बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, इतकेच नाही तर संशयिताने या तरुणाला पाकिस्तानातील लोकेशन देखील पाठवल्याचेही सांगितले जात आहे. तसेच या कामासाठी ५० जण हवे असून, त्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देऊ आणि मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असेही या मेसेजमध्ये म्हटले होते असे सांगितले जात आहे.. दरम्यान या प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
या संपूर्ण प्रकरणाबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतील एक मुलगा त्याच्या इंस्टाग्रामवर रील पाहात होता. त्याने एक संभाजी महाराज चित्रपटासंबंधीची रील बघतली. त्यावरील कमेंट पाहिल्या असता आरोपीने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून या तरुणाने कमेंट करणे सुरू केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पर्सनल आयडीवर कमेंट करण्यास सुरूवात केली, त्यानंतर त्यांच्यात धार्मिक बाचाबाची सुरू होती. पण याबाबत त्याने पोलिसांनी काही माहिती दिली नव्हती.
नंतर ऑडिओ क्लिप पाठवली
मग त्यानंतर त्याने एक ऑडिओ क्लिप इन्स्टाग्रामवर टाकली, ज्यामध्ये त्याने अयोध्या येथील मंदिर उडवायचे आहे आणि त्याकरिता काही मुले लागणार आहेत, तेवढी मुले आम्हाला पुरव, मी प्रत्येकी एक लाख रुपये देतो अशी ऑडिओ क्लिप पाठवली. यावर फिर्यादी मुलगा घाबरला आणि त्याने शिरुर कासार पोलीस ठाण्यात येऊन आम्हाला माहिती दिली.
त्यानंतर आम्ही त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्याची तात्काळ दखल घेतली. एटीएसी आणि सायबर पोलिसांना माहिती देऊन तात्काळ गुन्हा नोंद केला आहे. शिरूर कासार पोलीस ठाणे येथे २९९ आणि ३०२ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केला आहे. एटीसी व सायबर पोलीसांच्या मदतीने प्रकरणाचा तपास सुरू आहे. आणि इन्स्टाग्राम आयडी होल्डर याच्यापर्यंत पोहचून पुढील कारवाई केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.