अकोले : मोठ्या खंडानंतर मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. घाटघर, रतनवाडीसह पाणलोटात सुरू असणाऱ्या चांगल्या पावसामुळे भंडारदरा धरणात पुन्हा पाण्याची आवक सुरू झाली आहे.
भंडारदरा ८१ टक्के, तर निळवंडे धरण ८८ टक्के भरले आहे. हरिश्चंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा नदी परत एकदा दुथडी भरून वाहू लागली आहे. मुळा धरण ७५ टक्के भरले आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे.
जूनच्या मध्याला सुरू झालेला पाऊस सुमारे महिनाभर सुरू होता. या काळात काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. मात्र, मागील आठ-दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. ओढे-नाले रोडावले. धरणांमध्ये पाण्याची जेमतेम आवक सुरू होती. पावसाने ओढ दिल्यामुळे पश्चिम भागात अनेक ठिकाणी भात लागवडीची कामे खोळंबली. दोन-तीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. ओढे-नाले पुन्हा खळाळते झाले असून, धबधबे जोमाने कोसळू लागले आहेत.
भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत २२० दलघफू पाण्याची भर पडली. सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८ हजार ८९१ दलघफू (८०.५४ टक्के) होता, तर निळवंडे धरणात ७ हजार २६९ दलघफू (८७.२८ टक्के) पाणीसाठा होता. भंडारदऱ्यातून वीजनिर्मितीसाठी ८३५ क्युसेक, तर निळवंडे धरणातून वीजनिर्मितीसाठी ९०० क्युसेक, तर कालव्यामधून ६७० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
मुळा नदीच्या पाणीपातळीतही पावसामुळे चांगली वाढ आहे. कोतुळजवळ मुळा नदीचा प्रवाह सायंकाळी वाढून तो ८ हजार ३७२ क्युसेक झाला होता. सायंकाळी धरणातील पाणीसाठा १९ हजार ५०७ दलघफू (७५.०२ टक्के) झाला होता. नदीतील विसर्ग बंद असून कालव्यांमधून १ हजार २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
कालचा पाऊस मिमीमध्ये पुढील प्रमाणे- घाटघर ४०, रतनवाडी ५१, पांजरे ३६, भंडारदरा २०, निळवंडे ६. तालुक्याच्या पूर्व भागातही काल अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अकोले परिसरात दिवसभर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी सुरू होत्या.