अकोले : जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे भंडारदरा धरण ४५ टक्के, तर निळवंडे धरण ४० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मुळा धरणाचा पाणीसाठा आज, मंगळवारी सायंकाळी ११ हजार ६८ दलघफू, तर कोतुळ येथील मुळा नदीचा विसर्ग ५ हजार १६ क्युसेक झाला होता. मध्यंतरी काही दिवस पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, पाणलोट क्षेत्रात काल, सोमवारी पुन्हा चांगला पाऊस झाला. घाटघर ७७ मिमी, रतनवाडी ६९, पांजरे ५१, तर भंडारदरा ३० मिमी अशी भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद आहे. या पावसामुळे धरणात चोवीस तासांत २८८ दलघफू नवीन पाणी आले.
आज सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४ हजार ९४० दलघफू (४४.७५ टक्के) झाला होता. निळवंडे धरणात सकाळी ३ हजार ३३७ दलघफू पाणीसाठा (४०.११ टक्के) होता. जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण ४१.८७ टक्के भरले आहे. सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १० हजार ८८६ दलघफू होता. पावसाचा जोर काहीसा वाढल्यामुळे कोतुळ येथील मुळा नदीचा विसर्ग वाढून सकाळी ३ हजार ८२२ क्युसेक झाला होता. आढळा धरण ७७.३६ टक्के भरले आहे. सकाळी आढळा धरणात ८२० दलघफू पाणीसाठा झाला होता.