राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन एक वर्ष झालं तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. परंतु त्याबद्दल अद्याप निश्चित माहिती कोणीही दिलेली नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत झालेली भेट आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरत गोगावले म्हणाले, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेगळ्या कारणास्तव दिल्लीला गेले होते. तिथे त्यांची अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली. त्याचवेळी मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याचंही कळतंय. परंतु अद्याप मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो नाही. आता सह्याद्री बंगल्यावर एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत मी मुख्यमंत्री साहेबांना विचारेन, नक्की कोणती तारीख ठरली आहे? काय ठरलंय? जेणेकरून परत परत चर्चा नको. गोगावले टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला भरत गोगावले म्हणाले, तुमची सूत्रं सांगणार (मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदाबाबत) आणि आम्ही आशेवर बसणार. त्यापेक्षा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारतो, नेमकी काय तारीख ठरली आहे? योग्य वेळी ते होईल. वरून फायनल होईल तेव्हाच होईल (दिल्लीतल्या भाजपा नेतृत्वाने सांगितल्यावर अंतिम निर्णय होईल.) मला असं वाटतंय ते फायनल होण्याची वेळी आली आहे असं दिसतंय.

हे ही वाचा >> “…म्हणून राऊतांची भाषा बदलली”, अजित पवारांवरील टीकेवरून संजय शिरसाटांचा टोला

दरम्यान, यावेळी गोगावले यांना विचारण्यात आलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत, वाचाळवीरांना मंत्रीपदापासून दूर ठेवायचं आहे त्याबद्दल काय सांगाल. यावर भरत गोगावले म्हणाले, त्यांची काही स्ट्रॅटेजी असू शकते. वाचाळवीरांच्या संदर्भात त्यांनी काही सांगितलं आहे आणि ते काही चुकीचं नाही. कोण कोण वाचाळवीर आहेत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. आम्हा सर्व आमदारांना ते मान्य करावं लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat gogawale says amit shah has strategy for maharashtra cabinet expansion asc
First published on: 05-06-2023 at 16:41 IST