खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत शुक्रवारी (२ जून) ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीचे राज्यभर पडसाद उमटले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे”, याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं”. राऊत आणि पवार या दोघांमधली खडाजंगी थांबण्याचं नाव घेत नव्हती. अशातच पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना यावर प्रतिक्रिया विचारली. तर अजित पवार म्हणाले, संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचं वक्तव्य मी मनाला लावून घेत नाही. इतरांनी तरी ते कशाला मनाला लावून घ्यावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांच्या प्रतिक्रियेनंतर संजय राऊत यांनी माघार घेतली. ते म्हणाले, “मला अजित पवारांविषयी अर्धवट माहिती देऊन प्रश्न विचारला गेला. अजित पवार तुमच्याविषयी असं असं बोलले, परंतु ते असं बोलले नाहीत. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असल्याने आम्ही पटकन बोलून जातो. अजित पवार म्हणाले होते की, महाराष्ट्रात संयमाने वागलं पाहिजे. त्यांचं म्हणणं योग्य आहे मी सहमत आहे. अजित पवार असंही म्हणाले की थुंकण्यासंदर्भात संजय राऊत यांनी खुलासा दिला. मात्र मला वेगळा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिलं. मला त्याचा खेद वाटतो आहे.”

दरम्यान, संजय राऊत आणि अजित पवार या दोघांनीही हे प्रकरण मिटवलं असलं तरी यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट याबाबत म्हणाले, अजित पवारांनी काल एक खुट्टी ठोकली आणि तुमची भाषा बदलली. अजित पवारांनी तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत सांगितलं. तुम्ही मोठे नेते आहात, असं ते म्हणाले. याचा अर्थ असा होता की, तुमच्याबरोबर आता आम्हाला बोलणी करायची नाही. अजितदादांनी तुम्हाला तुमची लायकी दाखवली म्हणून तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदललं.

संजय शिरसाट संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, तुम्हीच सांगितलं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आता तुमची जळून राख झाली आहे, त्यामुळे आता तरी तुम्ही सुधरा. दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा इतर विषयांवर बोला, शेतकऱ्यांच्या विषयावर बोला. तुम्ही शिवसेना नेस्तनाबूत केली आहे. आता ‘सामना’ (शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र) इतर पक्षांचं मुखपत्र झालं आहे. मी संजय राऊतला सांगेन बाबा रे तू उद्धव ठाकरेंना बुडवलं आहेस. उद्धव ठाकरे गटाची वाट लावली आहेस. तुझं काम आता संपलं आहे. त्यामुळे तुझी ही बडबड थांबव, अशी मी तुला विनंती करतो.

हे ही वाचा >> “महायुतीत विधानसभेच्या १५, लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या नाहीत तर…”, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ने दंड थोपटले

शिरसाट म्हणाले, ‘सामना’त पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो दिसायचे, हल्ली राहुल गांधी आणि शरद पवारांचे फोटो दिसतात. सामना’ आता इतर पक्षांचं मुखपत्र झालं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat says ajit pawar gave answer to sanjay raut in his language asc
First published on: 05-06-2023 at 14:32 IST