लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं आहे. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ठाकरे सरकारनं लोकायुक्त कायदा करणार असल्याचं सांगितलं होतं. पण, कायदा केला नाही, अशी टीका अण्णा हजारेंनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत “अण्णांना आता ठाकरे दिसले का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

अण्णा हजारे काय म्हणाले?

“लोकायुक्त कायदा विधानपरिषदेत मंजूर झाला. हा क्रांतीकारण निर्णय आहे. फक्त नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे. वेळ पडली तर ८८ व्या वर्षी हा कायदा समजवण्यासाठी महाराष्ट्रात फिरेल. कारण, भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण केला पाहिजे,” असं अण्णा हजारेंनी म्हटलं.

“ठाकरे सरकारनं लोकायुक्त कायदा करणार असल्याचं सांगितलं होतं. पण, हा कायदा केला नाही. ठाकरे सरकारला हा कायदा नको होता. देवेंद्र फडणवीसांनी कायदा करण्यास वेळ घेतला. मात्र, कायदा केला,” असं कौतुक अण्णा हजारेंनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावरून भास्कर जाधवांनी अण्णा हजारेंना टोला लगावला आहे. “अण्णा कधी जागे झाले? २०१४ साली भाजपाचं सरकार आल्यापासून अण्णा झोपले होते. अण्णांना आता ठाकरे दिसले का? सत्तेवर आता ठाकरे आहेत का?” असा सवाल भास्कर जाधवांनी अण्णा हजारेंना विचारला आहे.