संगमनेर : भोजापूर धरण लाभक्षेत्रात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी तळेगाव, निमोण भागाला मिळावे अशी तेथील शेतकऱ्यांची मागणी होती. त्याची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेवरून सोडण्यात आलेले पाणी नान्नज दुमाला शिवारात पोहोचले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

तालुक्यातील तळेगाव, निमोण या भागातील पळसखेडे, निमोण, पिंपळे, सोनेवाडी, सोनोशी, नान्नज दुमाला, धनगरवाडा, तिगाव माथा या दुष्काळी गावांचे भवितव्य भोजापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या पुरचारीला पाणी यावे यासाठी या परिसराचे शेतकरी नेते किसन चत्तर यांनी सातत्याने मंत्री विखे आणि आमदार खताळ यांच्याकडे पाठपुरावा केला.

भोजापूर चारीचे पाणी मिळवून देऊ, असे वचन आ. खताळ यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दिले होते. त्यानंतर सर्वप्रथम पूरचारीची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात आली. अजूनही हे काम चालूच आहे. या वर्षी भोजापूर धरण पूर्ण भरल्यानंतर सर्वप्रथम ओव्हरफ्लोचे पाणी पूरचारीला सोडण्यात आले. नान्नज दुमाला शिवारात पाणी पोहोचल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूरचारीची गळती थांबवा

भोजापूर पूरचारीला जलसंपदा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अनेक ठिकाणी गळती लागली आहे. ही गळती त्वरित थांबवून नियमानुसार पाणी सोडावे. जलसंपदाने पाण्याचा विसर्ग वाढवण्याऐवजी तो कमी केला.

पाण्याचा विसर्ग ४० ते ५० क्युसेकने महिनाभर ठेवला, तर या पाण्याचा नान्नज दुमाला, बिरेवाडी, काकडवाडी या गावांना फायदा होणार आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवावा. – किसन चत्तर, शेतकरी नेते