CJI Bhushan Gavai on Guwahati: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला मान्यता मिळाल्यानंतर बेंचच्या इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी कोल्हापूर, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी एकनाथ शिंदेंसमोर २०२२ च्या गुवाहाटी दौऱ्याची आठवण काढली.

कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक न्यायदानाचे काम होत राहिले पाहिजे. कोल्हापूर खंडपीठाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र कोकणातील होतकरू वकिलना चांगली संधी प्राप्त होणार आहे. त्यांच्या उत्कर्षासाठी वसतिगृह बांधण्यासाठी नियोजित सर्किट बेंच जागेच्या ठिकाणीच एक एकर जमीन देण्यात यावी, अशी मागणी सरन्यायाधीश गवई यांनी केली.

गुवाहाटी दौरा आणि काय झाडी, काय डोंगर.. डायलॉगची आठवण

आपल्या भाषणात सरन्यायाधीश गवई म्हणाले की, माझे स्नेही विवेग घाडगे पाटील, संग्राम देसाई मला नेहमीच कोल्हापुरात येण्यासाठी आग्रह करत होते. मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाची परिषद संपन्न झाली. तेव्हाही घाडगे पाटील यांनी मला कोल्हापूरात येण्याबद्दल सांगितले होते. अगदी त्याच वेळी महाराष्ट्रातील नेत्यांचा गुवाहाटी दौरा सुरू होता.

विवेक घाडगे पाटील यांचे भाषण ऐकून मला त्यावेळचा “काय झाडी, काय डोंगर…” हा डायलॉग आठवला, असे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

गवई यांनी कोल्हापूर आणि पुणे येथून होणाऱ्या खंडपीठ मागणीचा संदर्भ घेतला. ते म्हणाले, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत केलेली होती. या विचारांच्या नगरीत सर्किट बेंच सुरू झाल्याने दूरवर राहणाऱ्या पक्षकारांची न्यायदानाची सोय होणार आहे. कर्नाटकातील गुलबर्गा लगत असणारी सोलापुरातील गावे, बेळगावला लागून असलेल्या चंदगड तालुक्यातील लोक असोत वा गोव्यालगत असलेल्या सावंतवाडीतील लोक यांना वेळ, पैसा, श्रम वाचवणारी न्यायव्यवस्था कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने मी नेहमीच या मागणीच्या पाठीशी राहिलो आहे.

शाहू महाराजांवरील कविता सादर

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नेहमीपेक्षा अधिक वेळ भाषण करणार असल्याचे सुरुवातीलाच म्हटले. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करणारी एक कविताही सादर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात शाहू महाराजांचे मोलाचे योगदान होते. आंबडेकरांच्या अडीअडचणीत शाहू महाराज धावून गेले, त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप दिली, असेही ते म्हणाले.