रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झालेले वैभव खेडेकर यांच्या बरोबर भाजपात प्रवेश केलेले मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा मनसेत दाखल झाले आहेत. यामुळे खेडेकर यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा मनसेला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी वैभव खेडेकर यांच्या सोबत भाजपात गेले होते. मात्र आता हे सर्वच पुन्हा मनसेत परतले असल्याने मनसेच्या जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले आहे.

जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल होवून जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, महिला पदाधिकारी तसेच विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मोठा समूहाणे राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. यामुळे हा वैभव खेडेकरांना मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.

मनसेत पुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अविनाश सौंदळकर – दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष (राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण), जुनेद बंदरकर – उपजिल्हाध्यक्ष (राजापूर विधानसभा), अरविंद मालाडकर – उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी विधानसभा), सुनील साळवी – जिल्हा सचिव, सचिन शिंदे – तालुका अध्यक्ष (रत्नागिरी), संदेश साळवी – तालुका अध्यक्ष (चिपळूण), नीलेश भामणे – तालुका अध्यक्ष (खेड), रुपेश चव्हाण – तालुका सचिव (रत्नागिरी) आदीचा समावेश आहे. या पुन्हा पक्ष प्रवेशाने जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मनसेला मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.