शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाचं यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. पक्षचिन्ह कुणाला मिळणार यावर आगामी निवडणुकींमध्ये कोणत्या गटाला अधिक यश मिळणार हे ठरणार आहे. मात्र, शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यासाठी निवडणुकीत चिन्ह महत्त्वाचं नसल्याचं सूचक वक्तव्य केलंय. “मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन,” असं अब्दुल सत्तार म्हणाले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

निवडणुकीतील चिन्ह आणि आपल्या मतदारसंघातील आपली ताकद यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पदं असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही.”

“काम केलं की जनतेची ताकद मिळते”

“काम केलं की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जनतेची ताकद मिळते, आशीर्वाद मिळतो. त्यामुळे राजकारणाच्या ट्रॅकवर कितीही गतीरोधक आले तरी गाड्या सरळ मुंबईपर्यंत जातात. दुसरीकडे जनता जनार्दनाने स्वीकारलं नाही, तर पालूतभर वखरावरही कुणी ठेवत नाही,” असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

“माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको”

आगामी निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाच्या युतीवर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू.”

हेही वाचा : पंकजा मुंडेंना शिंदे गटात घेण्याचा विचार करणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “एखाद्या नेत्यामुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे”

“दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल,” असंही सत्तारांनी नमूद केलं.