जिल्हा बाल कल्याण समितीच्या प्रयत्नांना यश; इंटरनेटच्या मदतीने घेतला शोध
बिहारमधील गावातून हरविलेल्या बालकाचा शोध लावण्यात जिल्हा बालकल्याण समिती व पोलिसांना यश आले आहे. बालकाची बोलीभाषेवरून त्याच्या आई-वडिलांचा माग इंटरनेटच्या माध्यमातून काढत जिल्हा बाल कल्याण व संरक्षण समितीने आई-वडील आणि मुलाची भेट शनिवारी येथे भेट घडवून आणली. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ अवधीनंतर मातापित्यांना समोर बघून बालकाने मिठी मारत चक्क हंबरडा फोडला.
जुलैमध्ये चंद्रपुरात हरविलेला बिहारचा एक बालक सापडला होता. विशेष म्हणजे तो फक्त स्वत:चे नाव व गाव इतकेच सांगत होता. आई-वडिलांचे नाव तसेच कोणत्या राज्यातील व जिल्हय़ातील आहे हेसुद्धा त्याला सांगता येत नव्हते. त्याचेपालकत्व जिल्हा बाल कल्याण व संरक्षण समितीने घेतले. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. वर्षां जामदार, सदस्या अॅड.मनीषा नखाते, डॉ.मृणालिनी धोपटे, अॅड.अभय बोधे तथा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी त्याला समोर बसवून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही केल्या यश येत नव्हते. शेवटी तो जे शब्द उच्चारेल त्याची नोंद घेतली व त्याप्रमाणे इंटरनेवर शोध सुरू केला. नेटवरून बिहारच्या पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक शोधून तेथे फोन लावला. तेव्हा ताडी या छोटय़ाशा गावाची माहिती घेतली. तेथील पोलिसांनी एकेक करून वेगवेगळय़ा पोलीस ठाण्याचे दूरध्वी क्रमांक दिले. तेथील पोलिसांना बिहारी भाषेत बालकाशी संवाद साधायला लावले. बोलताना हळूहळू बालकाच्या जवळपासच्या लोकांची नावे त्याने सांगितली. असे एकेक अंदाज बांधत बालकाच्या पालकापर्यंत पोहचण्यात बिहार पोलिस व जिल्हा बालकल्याण समितीला यश आले. त्याच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि बालकाशी बोलणे झाल्यावर मोबाईलवर व्हिडीओ कॉल लावला. विशेष म्हणजे व्हीडीओ कॉलवर बालकाने पालकांना बघताच हंबरडा फोडला. त्यानंतर बिहार राज्यातील मुंगेर जिल्हय़ातील बाल संरक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधून बालकाच्या आई-वडिलांना चंद्रपूरला बोलविण्यात आले. ११ सप्टेंबरला शोध लागल्यावर लगेच ते चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर आज १४ सप्टेंबर रोजी सकाळी बालकाचे आई-वडील चंद्रपूरला येताच बाल कल्याण समितीने बालकाला पालकांच्या हवाली केले. यावेळी बालकाने आई-वडिलांना बघताच मिठी मारली. यावेळी बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. वर्षां जामदार, अॅड.मनीषा नखाते, डॉ.मृणालिनी धोपटे, अॅड.अभय बोधे उपस्थित होते. यावेळी पालकांनी मुलाची भेट घडवून दिल्याबद्दल भावविभोर होऊन अक्षरश: बालकल्याण समिती अध्यक्षांच्या पाया पडले.