पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपाचा धुव्वा उडवला. ‘अब की बार २०० के पार’ अशी घोषणा देणाऱ्या भाजपाला दोन अंकी आकडा पार करता आला नाही. दरम्यान पश्चिम बंगालच्या निकालावरुन राज्यात महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्यांचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालमध्ये ममताच!

“पश्चिम बंगालच्या विश्लेषणाची चर्चा सध्या सुरु आहे. केंद्रीय नेते याबद्दल अधिकृत विश्लेषण करतील. अपेक्षित यश मिळालं नाही आणि ममता बॅनर्जीच्या पक्षाला यश मिळालं असं व्यक्तीश: वाटतं. आम्ही त्यांना पराभूत करु शकलो नाही हे सत्य आहे. आम्ही संपूर्ण विजय मिळवायचा या अपेक्षेने निवडणूक लढवली. पूर्ण विजय मिळाला नाही हेदेखील खरं आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

“यशाचं मोजमाप केलं तर ते भाजपाकडेच आहे. कम्युनिस्ट रसातळाला गेले. काँग्रेसचं बाष्पीभवन झालं. ममता बॅनर्जींची वाढ हवी तशी झालेली नाही. यशाचं मोजमाप केवळ भाजपाकेड आहे हेदेखील सत्य आहे,” असंही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “यशामध्ये आता दावेदार कोण? छुपे, आडवे, उभे हात कोणाचे हे ज्यांचं चिन्ह हात आहे त्यांनी ठरवावं. आव्हाड असं म्हणत असतील तर ती अदृश्य शक्ती आणि हात कोणाचा असेल याची चिंता काँग्रेसला जास्त करावी लागेल.आव्हाडांनी दिशादर्शन केलं आहे त्यामुळे काँग्रेस भुईसपाट झाली आहे. काँग्रेसला भुईसपाट करण्याच्या यशमागचा आनंद आणि अदृश्य शक्ती आव्हाड सांगत आहेत का हा प्रश्न आहे”.

आव्हाड नेमकं काय म्हणाले आहेत –

“पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..! “शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.” याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता,” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashish shelar on ncp jitendra awhad sharad pawar west bengal election result sgy
First published on: 03-05-2021 at 14:11 IST