“मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर”

मुंबईत पावसाने अक्षऱश: तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला.

Mumbai Rain, BJP, Atul Bhatkhalkar, Maharashtra CM Uddhav Thackeray
मुंबईत पावसाने अक्षऱश: तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. (File PHoto)

मुंबईत पावसाने अक्षऱश: तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. दरड आणि भिंत कोसळल्याने २१ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. दरम्यान राज्यात आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षित आपत्तींचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे आणि दरडग्रस्त भाग व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Mumbai Rain : मुंबईत पाऊसतांडव

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. “मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..,” अशी टीका त्यांनी ट्वीट करत केली आहे.

विविध दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा मृत्यू

मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले.

यंत्रणांकडून आपत्तीपूर्व दक्षता आवश्यक!

चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले. भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला. अंधेरीतील फिरदोस बेकरीचा मालक असलेल्या तरुणाचा दुकानातील साहित्य वाचवताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर पोईसर येथील घटनेत एक जण दगावला. वांद्रे रेक्लेमेशन येथे ४५ वर्षांच्या एका महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

मुंबई आणि उपनगर परिसरात शनिवारी दिवसभर ऊन होते. पावसाची फारशी चिन्हे दिसत नव्हती; परंतु रात्री ११ वाजता चित्र बदलले. शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ वाजल्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण केले. १२ ते २ या वेळेत मुंबईच्या सर्वच भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. मध्यरात्री दीड ते दोन तासांत अनेक भागांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर येथे काही ठिकाणी सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंनी काय आवाहन केलंय

विशेषत: दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठय़ा प्रमाणावर ढिगारा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे.

उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या मनोऱ्यांखाली मोठय़ा प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सावध करावे, काही ठिकाणी भूमिगत वाहनतळांमध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसान झाले व भांडुप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याचे लक्षात घेता यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची व समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

कोविड केंद्र व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे. पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे रोग पसरू नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे, असेही त्यांनी सांगितले.

हवामान विभागाचा इशारा

मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ असून ५० ते ६० किमी प्रति तास या वेगाने वारेही वाहतील. २३ जुलैला संभाव्य कमी दाबाच्या पट्टय़ामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाचे जयंता सरकार यांनी बैठकीत दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp atul bhatkhalkar on maharashtra cm uddhav thackeray mumbai rain sgy

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या