राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अजित पवारांना राज्यात करोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे,” असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

“अजित पवारांना काय झालं आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ”मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री….उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतील”.

“त्यामुळे अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असतं. माणसाने नेहमी नम्र राहायचं असतं. नीट बोलायचं असतं. सरकार पडणार नसेल तर इतका आकांडतांडव कशासाठी? एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणण्याचं कारण नाही. तुम्हाला ते पडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार याची तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता. जेव्हा सरकार पडेल तेव्हा सर्व टाइमटेबल माहिती होतं असं मान्य कराल,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना यावेळी इशारा देताना ते म्हणाले की, “खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil maharashtra government deputy cm ajit pawar sgy
First published on: 15-04-2021 at 12:26 IST