एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यापासून आधी मंत्रीमंडळ विस्तार, मग खातेवाटप आणि त्यानंतर चर्चा रंगली ती पालकमंत्री ठरवण्याची. राज्य सरकारकडून या प्रक्रियेसाठी केल्या जात असलेल्या विलंबावरून विरोधकांनी जोरदार टीका चालू ठेवली होती. या पार्श्वभूमीवर अखेर शनिवारी संध्याकाळी राज्य सरकारने विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची घोषणा केली. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंनी पुण्यातील पीएफआयच्या घोषणाबाजीवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

“पुण्यात हा गैरप्रकार घडला आहे. ज्यांनी कुणी या घोषणा दिल्या असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण नेमक्या याच सरकारच्या काळात कशा या घोषणा झाल्या? महाविकास आघाडीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता”, असा आक्षेप आदित्य ठाकरेंनी तळेगावातील जनआक्रोश आंदोलनात घेतला होता.

यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. “तुमच्या अडीच वर्षांच्या काळात कसे हिरवे झेंडे लागले, त्रिपुरात मशीद पाडली अशी अफवा उठल्यानंतर मालेगाव-अमरावतीत ४०-५० हजारांचा मॉब रस्त्यावर आला.हे विसरलात काय आदित्यजी? सरकार गेल्यामुळे तुम्ही एवढे विमनस्क अवस्थेत आहात की तुम्हाला आठवतच नाही की तुमच्या काळात काय काय झालं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरेंनी काढलेल्या जनआक्रोश आंदोलन मोर्चावरही तोंडसुख घेतलं. “कोणत्याही प्रकल्पाचा एक घटनाक्रम असतो.तो आदित्य ठाकरे यांनी सांगावा.पण तुम्ही येथून कोणते कोणते प्रकल्प बाहेर घालवले,याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एक यादीच जाहीर केली आहे. आहो,आपल्या अहंकारामुळे मुंबईची वाट लावली. मेट्रो प्रकल्पाचा खर्चही वाढला. त्यामुळे जो काही प्रकल्पांचा घटनाक्रम आहे,तो आमनेसामने मांडा”, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

“आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…” गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

“ते आक्रोश यात्रा काढत आहे. पण ते त्यांच्या पायावर कुर्‍हाड मारण्याचं काम करत आहेत”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता आम्ही शंभरी क्रॉस करू”

“आम्ही पुणे महापालिकेची निवडणूक सरकार नसतानाही जिंकणार होतो.आता तर सरकार आले आहे.मी पालकमंत्री झालो आहे.सरकार नव्हते त्यावेळी आम्हाला ८२ जागा मिळतील, असं सर्व्हेमध्ये सांगितलं गेलं.पण महापौर होण्यास ८५ जागा लागतात. मात्र आता सर्व अनुकूलता आली आहे.त्यामुळे आता आम्ही शंभरी क्रॉस करू”, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.