देशात करोनाची स्थिती आता नियंत्रणात आल्याचं चित्र दिसत आहे. त्यात केंद्रानं सर्व भारतीयांना मोफत लसीकरणाची घोषणा करत राज्य सरकारांना लसींचा पुरवठा करण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात भाजपाकडून सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. हिंगोलीमध्ये बोलताना भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लसीकरणाच्या आणि करोनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीला लक्ष्य केलं आहे. तसेच, करोना काळात सर्वकाही केंद्र सरकारने दिलं असताना तुम्ही काय केलं? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

“केंद्राने मदत केली म्हणून…”

करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची घोषणा केली होती. त्यावर बोट ठेवत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “केंद्राने सगळी मदत केल्यामुळे करोना निभावता आला. महाराष्ट्र सरकारने काय केलं? लस, एन९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, ऑक्सिजन हे सगळं केंद्र सरकारने दिलं. तुम्ही काय दिलं? फुटकं पॅकेजही दिलं नाही. रिक्षावाल्यांना १५०० रुपये देणार होते, ते अजून मिळायचे आहेत”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

लसी तर केंद्र सरकारने दिल्या, मग…

दरम्यान, केंद्रानं लसीकरण मोफत केल्यावरून देखील चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. “६ हजार कोटींचा चेक उद्धवजींनी दाखवला. लस आम्ही विकत घेणार आहोत म्हणे. पण आता लसी केंद्रानं मोफतच केल्या आहेत. मग ६ हजार कोटींचा चेक कुठे आहे? तो शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी द्या”, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख, परमबीर सिंह प्रकरणावरून निशाणा

“सामान्य माणसाला एव्हाना गजाआड टाकलं असतं. यांना किती तुम्ही स्कोप देणार? चार दोषी सुटले, तरी एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये, हे मान्य आहे. पण हे काय चाललंय? अतिरेक चाललाय सगळ्याचा. त्यामुळे तपास यंत्रणांनी आता हे सगळं थांबवावं. उच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे. ते सापडत नसतील, तर त्यांना बेपत्ता घोषित केलं पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

“किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ”

“किरीट सोमय्या या भ्रष्टाचार करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरले आहेत”, असं पाटील यावेळी म्हणाले. “पक्ष त्यांच्या पाठिशी आहेत. २६-२७ तारखेला ते नांदेडला येणार आहेत. ते नांदेडला सिनेमा बघायला येणार नाहीत. तिथेही काहीतरी होईलच”, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.