अभिनेता सुबोध भावे आणि शरद केळकरची मुख्य भूमिका असणारा ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. झी मराठीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने शिवभक्त आणि काही संघटना आक्रमक झाल्या असून इशारा दिला आहे. यादरम्यान कोल्हापुरातही काही शिवभक्तांनी सुबोध भावेची भेट घेतल आपला आक्षेप नोंदवला. दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी सुबोध भावेला आपले मुद्दे खोडून काढण्याचं जाहीर आव्हानच दिलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ‘हर हर महादेव’ चित्रपटाला आपला विरोध दर्शवला. यावेळी त्यांनी विरोध करण्यामागील कारणांचा पुनरुच्चार केला. ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्य पातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
“हर हर महादेव चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळाली आहे. मात्र, सेन्सॉर बोर्ड हे दिल्लीत बसले आहे. या बोर्डात नेमके कोण इतिहासकार आहेत माहिती नाही. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांसाठी राज्य सरकारने राज्य पातळीवर इतिहासकारांची समिती नेमावी. चित्रपटांचं पहिली स्क्रिनींग महाराष्ट्रात करून पुढे ते सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीसाठी दिल्लीला पाठवावे”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. तसंच याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सेन्सॉरमध्येही ऐतिहासिक टीम असते असं सुबोध भावे यांनी सांगितलं आहे. यासंबंधी संभाजीराजेंना विचारण्यात आलं असता त्यांचा कितपत अभ्यास आहे अशी विचारणा केली.
“शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सुबोध भावेंनी पत्रकार परिषद घेऊन मी मांडलेले मुद्दे चुकीचे आहेत असं सांगावं. जे मी पाच-सहा मुद्दे मांडले त्यावर त्यांनी बोलावं. मी केलेली भूमिका रास्त आहे, याच्यात काही चुकीचं नाही हे महाराष्ट्राच्या लोकांना सांगावं. त्यावेळी स्त्रियांचा बाजार भरत होता हे त्यांनी सांगावं. महाराजांनी नरसिंहाचा अवतार होऊ अफजल खानाचा कोथळा फाडला हे त्यांनी बोलावं. सिनेमाटिक लिबर्टी योग्य की इतिहास हे त्यांनी सांगावं. शिवभक्त आहे ना तो, मग माझे मुद्दे खोडून काढावेत,” असं आव्हानच संभाजीराजेंनी दिलं आहे.
यापुढे बापजन्मात ऐतिहासिक भूमिका साकारणार नाही
‘हर हर महादेव’ चित्रपट झी मराठीवर प्रदर्शित होणार असल्याने कोल्हापुरातील शिवभक्त अभिनेते सुबोध भावेच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्याने आपण यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका साकारणार नाही अशी घोषणाच करुन टाकली आहे.
“माझं महाराजांवरील प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं आहे. ते मी मरेपर्यंत करत राहणार. परंतु, इथून पुढे ऐतिहासिक चित्रपटातील कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शुटिंग सुरू असलेल्या शेवटचा बायोपिक सिनेमा असेल,” असं सुबोध भावेने म्हटलं आहे.