भाजपाच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी मध्यरात्री संपन्न झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठं अपयश मिळाल्यावर केंद्रीय नेत्यांना कान टोचल्यानंतर राज्यात ही पहिलीच बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सायंकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत बैठक सुरू होती. मध्यरात्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीबद्दल माहिती दिली.

काय म्हणाले चंद्रशेख बावनकुळे?

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जो निकाल समोर आला त्या निकालाचे विश्लेषण या बैठकीत करण्यात आले. महाविकास आघाडी आणि खासकरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अपप्रचार करून मतं मिळविली. भाजपा संविधान बदलणार, असा खोटा प्रचार केला. आदिवासी समाजाला सांगितले की, तुमचे हक्क हिसकावले जाणार. महिलांना सांगितले की, प्रत्येक महिना खटा खट साडे आठ हजार रुपये देणार. असा खोटा प्रचार केल्यामुळे भाजपाला फटका बसला”, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; अनोळखींच्या खात्यातून लाखोंचे व्यवहार, आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं कनेक्शन काय?

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच आगामी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी कोण उमेदवार असतील, यावरही चर्चा झाली, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला. पण आता लोकांना सत्य कळले आहे. केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असेल तर जनतेचा फायदा होतो. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राच्या योजना थांबविल्या जातील. केंद्र सरकार राज्याला मदत करू इच्छिते, पण राज्य सरकारने योग्य सहकार्य न केल्यास राज्याच्या जनतेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आजच्या बैठकीत विधानसभेच्या अनुषंगानेही चर्चा झाली.