सोलापूर महापालिका सभागृहात जुळे सोलापूर प्रारूप विकास आराखडय़ावर वादळी चर्चा सुरू असताना आसनावर बसून घेण्याच्या कारणावरून भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी पालिकेचे अपर आयुक्त विलास ढगे यांना उद्देशून धमकी दिल्याने सभागृह अवाक झाले. दरम्यान, या प्रकरणी पालिका कर्मचारी संघटनांनी नगरसेवक पाटील यांच्या असंसदीय वक्तव्य तथा धमकीबद्दल निषेध नोंदविला आहे.
जुळे सोलापूर प्रारूप विकास आराखडय़ाच्या प्रस्तावावर पालिका सभागृहात प्रदीर्घ चर्चा होत असताना त्यात त्याच त्या मुद्यांवर लक्ष वेधले जाऊ लागल्याने महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी संबंधित ‘वाचाळवीर’ नगरसेवकांना तंबी दिली. सभागृहाचा अधिक वेळ घेऊ नका, महिला सदस्यांचाही विचार करा, अशा शब्दात महापौरांनी सुनावले. तरीसुद्धा काही नगरसेवक महापौरांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आपला हेका कायम ठेवत होते. त्या वेळी महापौरांच्या शेजारी आसनस्थ असलेले अपर आयुक्त ढगे यांनी नगरसेवक जगदीश पाटील यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी आसनावर बसून घेण्यास खुणावले. परंतु त्यामुळे पाटील यांचे पित्त खवळले. ‘माझ्या हक्कावर गदा आणणारे तुम्ही कोण’, असा सवाल करीत त्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. एवढेच नव्हे तर ते अपर आयुक्तांच्या विरोधात एकेरीवर घसरले आणि दमबाजी केली. यामुळे सभागृह नेते संजय हेमगड्डी यांच्यासह काँग्रेसचे अनिल पल्ली, चेतन नरोटे आदी नगरसेवक संतप्त झाले. वरिष्ठ अधिकारी हे देखील सभागृहातील कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग असून त्यांच्याविषयी असंसदीय भाषा वापरून व दमबाजी करणे योग्य नसल्याचे संतप्त नगरसेवकांनी पाटील यांना सुनावले.
तथापि, सभागृहात अपर आयुक्त ढगे यांना धमकी दिल्याबद्दल नगरसेवक जगदीश पाटील यांचा पालिका कर्मचारी संघटनेने निषेध नोंदविला. यासंदर्भात संघटनेचे नेते अशोक जानराव यांच्यासह प्रदीप जोशी, तेजस्विनी कासार आदींच्या शिष्टमंडळाने महापौर प्रा. सुशीला आबुटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. नगरसेवक पाटील यांच्या असंसदीय वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp corporator threat to additional commissioner
First published on: 04-03-2015 at 03:30 IST