भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेखही केला होता. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला होता. एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका किंवा टिप्पणी करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की ते ज्या मनीष भंगाळे प्रकरणाबद्दल बोलतात त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळेने त्यांच्यावर आरोप लावल्यावर मी स्वत: कमिटी तयार करुन १२ तासांत रिपोर्ट द्यायला लावला. १२ तासात खडसेंना त्यात क्लीन चीट मिळाली. भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकलं, कित्येक दिवस तो जेलमध्ये होता. त्या क्लीन चीटलाही ते ड्राय क्लिनर वैगेरे म्हणत असतील तर माहिती नाही”.

आणखी वाचा- “भीती गुलामांना असते,” फडणवीसांवरील टीकेचं खडसेंकडून समर्थन

“त्यांना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबाने एमआयडीसीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वत: बैठकी घेतल्या आणि निधी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मी स्वत: त्यात न्यायाधीशांची कमिटी तयार केली. त्याचा रिपोर्ट आला, पण त्याच्या आधीच काही लोक हायकोर्टात गेले. कोर्टाने त्यावेळी गुन्हा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यामुळे तो गुन्हा मी दाखल केला किंवा आकसेपोटी केला असं नाही. उत्त न्यायालयाने गुन्हा दाखल करायला लावला. त्यावेळी त्यांनी मला तात्काळ रिपोर्ट गेला पाहिजे अशी विनंती केली. दोन महिन्यातच आम्ही तो कोर्टात सादर केला. पण कोर्टाने स्वीकारला नाही. तो प्रलंबित असून मान्य झाला नाही. यामुळे उगाच लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा निशाणा

एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या काही तक्रारी असतील तर घरातल्या घरात चर्चा करुन त्या दूर करु असं सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेप्ठांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे अशी माहिती दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis on eknath khadse allegations sgy 87
First published on: 11-09-2020 at 13:28 IST