राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत शिवेसना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी संजय राऊतांचा ‘नॉटी नामर्द’ असा उल्लेख केला होता. आपल्या या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईत भाजपातर्फे आयोजित कॅन्सरमुक्त अभियानाचा अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…”; अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘१०० मार्कांचा पेपर’; म्हणाल्या…

संजय राऊतांचा नॉटी नामर्द उल्लेख करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “त्यांना लोकांनीच ही उपाधी दिली आहे. मध्यंतरी त्यांनी एक चुकीची पोस्ट टाकली तेव्हा एका महिला नेत्यानेही त्यांचा तसाच उल्लेख केला. तेच मी उचलून तिथे टाकलं होतं. पण नामर्द शब्दाचा तंतोतंत अर्थ घेऊ नये. याचा अर्थ म्हणजे तुम्ही समोरुन न वार करता मागून करता असा होतो”.

“मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट”

अमृता फडणवीस यांनी यावेळी मुंबईतील वाहतूक कोंडी घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा केला. “मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मी एका सामान्य स्त्रीप्रमाणे बाहेर पडत असते,” असं सांगत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्त्रियांचा सर्वाधिक आदर”

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा असल्याची चर्च सुरु असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही पुरोगामी संघटना आहेत. स्त्रियांचा आदर करणं ही संघाची प्राथमिकता आहे. मी संघ आणि भाजपा या दोन्ही संघटनांच्या जवळ आहे. पण मी अराजकीय आहे. देशात स्त्रियांचा सर्वाधिक आदर कुठे होत असले तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतो हे मी खात्रीने सांगू शकते”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं चुकीचं”

“स्त्रियावंर टिप्पणी करणं आणि खासकरुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर हे मला स्वत:ला फार चुकीचं वाटतं. आपण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही कोणीतरी काहीतरी बोलतं, मग त्यावर आंदोलनं होतात. पण ही मानसिकतेची गोष्ट आहे. काय बोलायचं, काय नाही याचा विचार आपण केला पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत दरवेळी कधी अत्याचार झाला, कोणी काही बोललं की कारवाई करतो. पण आपल्याला जो अमूलाग्र बदल घडवायचा आहे तो मानसिकतेचा आहे,” असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.