भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सोबत घेण्यासंदर्भात सर्व चर्चा झाल्याचा दावा केला होता. यावरून राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली असून महाविकास आघाडीतील पक्षांकडून देखील त्यावर प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेनेकडून देखील यावरून भाजपावर टीका केली जात असताना खरंच असं काही झालं होतं का? अशी देखील चर्चा सुरू आहे. यासंदर्भात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
आशिष शेलार यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना २०१७ साली घडलेल्या घटनाक्रमाविषयी गौप्यस्फोट केला होता. “२०१७चा काळ होता. जेव्हा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युती करावी असं वाटू लागलं. शिवसेनेचं रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असं सरकार करावं, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू”, असं आशिष शेलार यांनी सांगितलं होतं. “आम्ही तेव्हा म्हटलं तीन पक्षांचं अर्थात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला. आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही असं सांगितलं”, असं देखील आशिष शेलार म्हणाले होते.
दरम्यान, आशिष शेलार यांच्या या दाव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावर टीका केली जात आहे. यासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
२०१७मध्ये नेमकं काय घडलं होतं? यासंदर्भात फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी “जो बीत गई, वो बात गई” अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देत या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यास बगल दिली. यावेळी मनसेसोबत युतीच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे? असं विचारलं असता त्यावर फडणवीसांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.
“या चर्चा कपोलकल्पितच!”
“या युतीच्या बातम्या कपोलकल्पित आहेत. काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत. आमची अजून कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, की अलिकडच्या काळात राज ठाकरेंनी घेतलेल्या बहुतांश भूमिका आमच्याही राहिलेल्या आहेत. पण आमची कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. त्यामुळे आत्ता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया फारच अपरिपक्व आहेत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.