भाजपची निवडणूक व्यूहनीती
प्रशांत देशमुख, वर्धा</strong>
निवडणुका जिंकण्यासाठी लाटेवर किंवा करिष्म्यावर विसंबून चालणार नाही. पक्षाचा मूळ मतदार वृद्धिंगत करणे गरजेचे आहे, असे निदर्शनास आणत भाजपच्या संघटना धुरिणांनी बुथनिहाय संघटना मजबूत करीत पक्षाचा मतदार ५१ टक्क्यापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांपुढे ठेवले आहे.
भाजपचे नवनियुक्त प्रदेश संघटनमंत्री विजय पराणिक (मराठवाडा) यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा संपर्क अभियान सुरू केले आहे. या दौऱ्यात ते जिल्हय़ाच्या कोअर समितीच्या बैठकीत पक्ष संघटनेच्या आगामी कार्यक्रमाबाबत सल्ला देत आहे. त्यांच्यासह काहींनी संघटन मजबूत करताना ‘गुजरात पॅटर्न’ महाराष्ट्रात अंमलात आणण्याचे निश्चित केले. तोच आगामी निवडणुकांत पक्षाला राज्यात विजय मिळवून देऊ शकतो, असे स्पष्ट करीत जि.प. व शहरात प्रभागनिहाय बुथ मजबूत करण्याचे सूत्र मांडले. एका बुथवर २५ कार्यकर्त्यांची चमू काम करणार. पाच ते सात बुथमागे एक शक्तीप्रमुख निगराणी ठेवणार. मतपुस्तिकेतील एका पानावर असणाऱ्या मतदारांपैकी भाजपचे व अन्य पक्षांचे किती मतदार आहेत. यावर निवडणूक काळात नजर ठेवली जाईल. बुथ समिती मतदानावेळी अशांचे मतदान पक्षासाठी करवून घेण्यासाठी सर्व ते उपाय योजतील.
प्रत्येकवेळी लाटेवर विजय मिळणे शक्य नसल्याने एकूण मतदारांपैकी ५१ टक्के मतदार करण्याचे धोरण ठरले आहे. आज काँग्रेसचा २५ ते ३० टक्के निष्ठावंत मतदार असून भाजपचा केवळ १५ ते २० टक्केच आहे. त्यात भर घालण्यासाठी नव्याने मतदार झालेल्या आठ कोटी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
मतदार नोंदणीतही पदाधिकाऱ्यांना पुढाकार घेण्याच्या सूचना मिळाल्या. पक्षापासून दूर राहणाऱ्या मुस्लीम मतदारांपैकी तलाक विधेयकाच्या पाश्र्वभूमीवर मुस्लीम महिलांची सहानुभूती पक्षासाठी मिळवण्याचे अन्य एक सूत्र आहे. महिला बचतगटात चंचूप्रवेश करीत हा मतदार वळवण्याची तयारी करण्याचे सूतोवाच करण्यात आले.
समाजमाध्यमावर भाजप मागे पडत असून काँग्रेस समर्थक आक्रमक होत असल्याचे संघटना नेत्यांचे निरीक्षण आहे. ‘व्हॉट्सअॅप’ हे ग्रामीण भागातही लोकप्रिय असल्याने त्या माध्यमातून तळपातळीवर पोहोचण्याची सूचना मिळाली. मुख्य म्हणजे सत्ताधारी झाल्यानंतर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येही अरेरावी आल्याने नेते चिंतित आहे. या पाश्र्वभूमीवर जनतेशी नम्रपणे वागा, जनतेचा पक्षावरील राग वाढेल असे वर्तन करू नका, स्वत: समस्या विचारण्याची भूमिका ठेवा, असेही सल्ले मिळाले. या सर्व वाटचालीत पक्षाच्या खासदार व आमदारांना विश्वासात घ्या, असेही सुचवण्यात आले. संघटन व लोकप्रतिनिधींनी परस्परविरोधी भूमिका न घेण्याचे सांगण्यात आले. आगामी ग्रामपंचायत निवडणुका हे पहिले लक्ष्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याविषयी विचारणा केल्यावर प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी खासदार, आमदारांशी बोला, असे सुचवत अधिक भाष्य करण्याचे नाकारले. जिल्हाध्यक्ष राजू बकाने हे म्हणाले बुथनिहाय संघटन मजबूत करण्यावर यापुढे लक्ष दिले जाणार आहे. पक्षाचा मूळ मतदार वाढवल्याने प्रमुख धोरण आहे. मुस्लीमच नव्हे तर उपेक्षित सर्व घटक भाजपसोबत चालतील, याची खबरदारी घेऊ. पंचायत पातळीवर पक्षाचे लोकप्रतिनिधी वाढवण्यावर आम्ही भर देणार आहोत.