भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या जागेसाठी स्वतःचा उमेदवार उभा करण्याऐवजी मला पाठिंबा दिला, यातून खरंच त्यांना सामाजिक बदल घडवून आणायचा असल्याचे दिसते, असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये व्यक्त केले.
भाजपने राज्यसभेच्या जागेसाठी रामदास आठवले यांनाच उमेदवारी दिली आणि ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे आठवले राज्यसभेवर निवडूनही गेले. त्या पार्श्वभूमीवर येथे पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, शिवसेना-भाजपशी करण्यात आलेली युती ही केवळ सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आहे. राज्यातील महायुती लोकसभेच्या ३५ तर विधानसभेच्या १७० जागा जिंकेल, असेही भाकीत त्यांनी केले. रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या ३० जागा हव्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.