औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपाकडून जलआक्रोश मोर्च्याला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सहभागी झाले आहेत. औरंगाबादमधील जलआक्रोश मोर्चासाठी तीन हजार हंडे, तर आठ हजार झेंडे घेऊन भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेने फक्त भावनांचे राजकारण केले

हा भाजपाचा मोर्चा नसून औरंगाबाद जनतेचा आक्रोश आहे. जो पर्यंत औरंगाबादच्या जनतेला पाणी मिळणार नाही तोपर्यंत भाजपा शांत बसणार नसल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेने केवळ भावनेचे राजकारण केले. पण थेंबभर पाणी औरंगाबादला देऊ शकले नसल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. याच मार्गावर आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वखाली मोर्चा काढला आणि सत्ता बदलली होती. आता त्याच मार्गावर आम्ही चाललो आहे. सत्ताबदल जेव्हा करायची तेव्हा करूच पण आज व्यवस्थाबदलबाबत हा मोर्चा असल्याचं फडणवीस म्हणाले.

शिवसेनाविरोधातही घोषणाबाजी

औरंगाबादमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले आहेत. औरंगाबादमधील पाणीप्रश्नासाठी महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

पैठणगेट, गुलमंडी, खडकेश्वर मार्ग, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आणि महापालिका कार्यालय या मार्गाने भाजपाचा मोर्चा काढण्यात आला आहे.