राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. एकीकडे राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तावर चर्चा करत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यघटनेचा हवाला देत हे राज्य सरकारच बेकायदेशीर असल्याचे सांगत दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी १२ मंत्र्यांची गरज लागते, असे ट्वीट केले होते. राऊत यांच्या दाव्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांच्या काळात किती मंत्री होते हे त्यांना आठवत नसेल, तर त्यांनी घरी जाऊन गजनी सिनेमा बघावा”, असा सल्ला शेलारांनी राऊतांना दिला आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्री, राष्ट्रपतीही जनतेतूनच निवडा; अजित पवार यांची शासनावर टीका
काय आहे राऊतांची मागणी?
भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४ १ए नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले २ आठवडे महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले होते. तसेच राज्यात नेमक काय चाललं आहे? असा प्रश्नही त्यांनी राज्यपालांना विचारला होता. एवढचं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या द्विसदस्यीय मंत्रिमंडळाचे निर्णयही वैध, कायदेतज्ज्ञांचा निर्वाळा
आशिष शेलारांचा सल्ला
संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांनी घरी गेल्यावर गजनी सिनेमा नक्की बघावा. ज्यांना विसरण्याची सवय असते अशा सगळ्या पंडितांनी हा सिनेमा बघावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे. ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे राज्य होते त्यावेळी ३२ दिवस किती मंत्री होते याचं उत्तर त्यांनी द्यावं, याचा अर्थ त्यांचे सरकारही अनाधिकृत होतं का? असा सवालही त्यांनी केला आहे.