पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने भाषण करण्यास नकार दिला. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा सारा प्रकार घडला. यावरून शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला. बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेतेमंडळींना फोडून भाजपा निवडणूक लढताना दिसत आहे अशी टीका करण्यात आली. तसेच टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदी असाही उल्लेख करण्यात आला. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला आणि ‘सामना’ला टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वीच जयंती साजरी करण्यात आली. मुंबईत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले नाही असा आरोप करत अतुल भातखळकरांनी काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला. “सामना’ने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे, त्याचा विचार करावा. शिवसेनाप्रमुखांना जयंतीदिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर…”, अशी बोचरी टीका भातखळकरांनी केली आहे.

नक्की काय लिहिलं आहे ‘सामना’मध्ये…

“प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढला आहे. टागोरांप्रमाणे दाढी वाढलेले पंतप्रधान मोदीही काल कोलकात्यात येऊन गेले. निवडणुकांत कोणीतरी जिंकेल व कोणीतरी हरणारच आहे. हिंदुस्थानी लोकशाही ‘ट्रम्प छाप’ नाही. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणेच प. बंगालात भाजपने धार्मिक फाळणी सुरू केली आहे. कौल हा स्वीकारावाच लागतो. पण कौल आपल्या बाजूने वळावा, यासाठी जे अघोरी प्रयोग आपल्या लोकशाहीत केले जातात, ते असह्य ठरतात”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader atul bhatkhalkar slams uddhav thackeray shivsena sanjay raut rahul gandhi balasaheb thackeray vjb
First published on: 25-01-2021 at 18:37 IST