Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray : हिंदी सक्तीच्या मुद्यानंतर महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड परिसरात झालेल्या मारहाणीचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले. त्या वादात भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनीही उडी घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या विधानानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, त्यानंतर आता मराठी विरुद्ध अमराठी या वादात भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनीही उडी घेतली आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान देत इशारा दिला आहे. उत्तर भारतीय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे, त्यांच्यापैकी कोणी आव्हान दिलं तर राज ठाकरेंना ते झेपणार नाही, अशा शब्दांत बृजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह काय म्हणाले?

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. भाषा जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की तुमच्या या कृतीमुळे उत्तर भारतीयांचं आणि महाराष्ट्राचं नातं तुटणार नाही. मी त्यांना सांगतो की त्यांनी वाचलं पाहिजे. कदाचित ते लिहित-वाचत नसतील. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने कैद केलं होतं, तेव्हा त्यांना कैदेतून मुक्त करण्याचं काम आग्र्यातील आमच्या व्यापाऱ्यांनी केलं होतं”, असं ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले आहेत.

“राज ठाकरेंना हेच सांगू इच्छितो की त्यांनी थोडं वाचन करावं. आज तुम्हाला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो, त्या अभिमानाच्या इतिहासासाठी उत्तर भारतीयांनी देखील घाम गाळलेला आहे. खरं तर राज ठाकरे खूप खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत. जेव्हा राज ठाकरे अयोध्येत येणार होते, तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं होतं की मी त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरे हे देखील कुठेतरी अयोध्येशी जुडलेले आहेत. तरीही त्यांचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना मारहाण करतात हे योग्य नाही”, असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.

“राज ठाकरे अयोध्येत आले नाहीत. पण त्यानंतर आता राज ठाकरेंनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे आता उत्तर भारतातील तरुणांमध्ये त्यांच्याबाबत रोष आहे. ते एवढे संतापलेले आहेत की यांच्यापैकी कोणाला आव्हान दिलं की चला राज ठाकरेंच्या भेटीला जायचं, तर राज ठाकरेंना ते झेपणार नाही. त्यामुळे मी हे जबाबदारीने सांगतो की राजकारण करायचं तर करा. पण भाषा, जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करू नका”, असं बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.