मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर राज्यातील मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, अशा लोकांना जात प्रमाणपत्र देण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी नेमकं टिकणारं आरक्षण कधी मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सूचक विधान केलं आहे. तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. आज पुण्यातील सर्वपक्षीय ‘वाडेश्वर कट्टा’ कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं.
हेही वाचा- “मराठा समाज शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा दादांना नेमका…”, रामदास कदमांची अजित पवारांवर टीका
मराठा आरक्षणावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात तीन कोटी लोकसंख्या असलेला मराठा समाज आणि साडे तीन कोटी लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे. अशा सात कोटी समाजाच्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्हीही आणि ओबीसी नेत्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या संत महतांनी जी सामाजिक वीण गुंफली आहे, ती तोडणं किंवा जोडणं आपलं काम नाही. त्यामुळे तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल.”