पुण्यामध्ये एका शिक्षकाने १२वीचे गुण वाढवून देतो असं सांगत एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्यावरून सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणावर संताप व्यक्त करत राज्य सरकारला परखड शब्दांमध्ये जाब विचारला आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी पुण्याप्रमाणेच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या अशाच काही घटनांचा संदर्भ देत या मुद्द्यांवरून देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करून त्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.

फक्त पुणेच नाही तर ठाणे, बीड…

आपल्या व्हिडीओमध्ये पुण्याच्या घटनेसोबतच चित्रा वाघ यांनी राज्यात इतर ठिकाणी घडलेल्या घटनांचे देखील संदर्भ दिले आहेत. “राज्यातली विकृती टोकाला गेल्याचं दिसतंय. पुण्यात शिक्षकाने गुण वाढवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचा अत्यंत किळसवाणा, घाणेरडा आणि संतापजनक प्रकार घडलाय. सध्या अशा प्रकारांची मालिकाच राज्यात घडतेय की काय असा प्रश्न मला पडतोय. ठाण्यात पालिकेचा आरोग्य उपायुक्त विश्वनाथ केळकर याने एका नर्सकडे अशी मागणी केली. साताऱ्यात गटशिक्षण अधिकाऱ्याने शिक्षिकेकडे अशी मागणी केली. बीडमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या एका अधिकाऱ्याने अनुकंपा तत्वावर काम करणाऱ्या महिलेकडे अशी मागणी केली. बीडच्या दिनरूडमध्ये शेतकरी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. तिने विरोध केल्यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण झाली आणि पोलिसांनी त्या कुटुंबावरच गुन्हा दाखल केला”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

सगळे देखावे संपले असतील, तर…

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या या घटनांचा संदर्भ देऊन चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला सवाल केले आहेत. “विकृती वाढत चालली आहे. सरकारचं तिकडे लक्ष नाही. एकमेकांना सांभाळून घेण्यात ते व्यस्त आहेत. मायबाप सरकारला मला विचारायचं आहे की तुमचं जर भांडण आणि सगळे देखावे संपले असतील तर आपण महिला आणि मुलींच्या प्रश्नांवर लक्ष देणार आहात का? रोज अशी विकृती वाढते आहे. यावर काही नियंत्रण आणणार आहात का?”, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केला आहे.

 

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीच्या परीक्षेत तुला गुण वाढवून देतो, असं सांगून अभिजित पवार हा सदर मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मात्र, नकार देऊन देखील प्रकार सुरूच राहिल्यामुळे अखेर सदर विद्यार्थिनीने शिक्षक अभिजित पवारने केलेला फोनकॉल रेकॉर्ड केला आणि आपल्या पालकांना, तसेच नातेवाईकांना ऐकवला.

काळं फासत काढली धिंड!

हा प्रकार लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आणि इतर नातेवाईक तसेच परिचितांनी शिक्षकाला जाब विचारण्यासाठी थेट महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी विद्यार्थिनी देखील सोबत होती. यावेळी अभिजित पवारला सगळ्यांनी रंगेहाथ पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. तसेच, त्याच्या तोंडाला शाई फासून त्याची महाविद्यालयातून थेट विश्रामबाग पोलीस स्थानकापर्यंत धिंड काढण्यात आली.