राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय. या राजीनाम्याच्या निर्णयानंतर भाजपाने जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये जमलेल्या आमदारांनी या वृत्तानंतर एकच जल्लोष केला. विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवून आनंद साजरा केला. मात्र या निकालावर आता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नक्की वाचा >> CM Uddhav Thackeray Resign: निरोपाच्या भाषणात नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे; वाचा त्यांचं राजीनाम्याचं भाषण

महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतता आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात शिवसेनेनं बंडखोर १६ आमदारांना निलंबित केल्याची याचिका न्यायप्रविष्ठ असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं सर्वोच्च न्यायलयात धाव घेत बहुमत चाचणीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देताना उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर ताज हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे हॉटेलबाहेर निघाले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरलं. त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांनी हात जोडून, “आम्ही तुम्हाला उद्या (३० जून २०२२ रोजी) सर्वकाही सांगू,” असं उत्तर पत्रकारांना दिलं.

दरम्यान, उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. ‘हमारा नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’, ‘राज तिलक की करो तयारी, आ रहे है भगवाधारी’, ‘देवेंद्रजी अंगार है बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देत देवेंद्र फडणवीसांचा जयजयकार भाजपा समर्थकांनी केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले होते. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाने प्रथमच या राजकीय लढाईत उडी घेतल्याचं दिसून आलं. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याशिवाय काही अपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ४६ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे,’’ अशी मागणी भाजपाने केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आज सकाळी राज्यपालांनी यासंदर्भातील निर्देश जारी करत उद्या म्हणजेच ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं होतं. मात्र आपल्याला हा खेळ खेळायचा नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच राजानीमा दिला.