बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा तिथे नेमके कोण होते? यावर शिवसेना उबाठा गट आणि भाजपामध्ये नेहमीच शाब्दिक चमकम होत असते. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक वाक्य उच्चारल्यामुळे शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली, असे गृहित धरले जात होते. शिवसेना आणि भाजपा २०१९ साली वेगळे झाल्यानंतर बाबरी पाडण्यात आमचाच हात होता, यावरून श्रेयवाद दिसून आला. विशेष करून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी पडली असावी किंवा बाबरी पडली तेव्हा ते शाळेत होते, असे आरोप उबाठा गटाकडून सातत्याने करण्यात येत होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवा करतानाचा फोटो एक्स अकाऊंटवर टाकला आहे.

हे वाचा >> “बाळासाहेबांचं ते एक वाक्य…”, बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी आपल्या एक्स अकाऊंटवर एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो कारसेवा करतानाचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या फोटोसह दिलेल्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, “जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.”

बाबरी ही मशीद नव्हती. परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी कबुली फडणवीस यांनी अनेकदा दिलेली आहे. तसेच राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये मी कारावास भोगला. बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असेही ते म्हणाले होते.

“बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठं होता?”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले, “कधी मुंबईच्या बाहेर…”

मागच्याच महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीशी बोलताना बाबरी मशिदीच्या पतनावर भाष्य केले होते. कारसेवेची आठवण सांगताना ते म्हणाले, “ज्यावेळेस पहिल्यांदा राम शीला पूजन झाले, तेव्हा माझे वय १८ वर्षांचे होते. पहिल्या कारसेवेच्या वेळी मी स्वतः गेलो होतो. अयोध्येतून रामजन्मभूमीच्या ठिकाणी पायी चालत जात असताना आमच्यावर लाठीचार्ज झाला. बदायू येथील केंद्रीय कारागृहात मी १७ ते १८ दिवस काढले.” त्यानंतर १९९२ साली मी पुन्हा अयोध्येत गेलो होतो. बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हाचा आनंद वेगळाच होता. तो शब्दात सांगता येणार नाही. अटलजींच्या काळातही पुन्हा कारसेवा झाली, तेव्हाही आम्ही गेलो होतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेय घ्यायचे नाही, असे ठरले होते

“बाबरीचा ढाचा पडला, तेव्हा भाजपाचीच माणसे तिथे होते. जे लोक (शिवसेना उबाठा गट) तिथे असण्याचा दावा करत आहेत, त्यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. तिशल्या मंचावर अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती उपस्थित होत्या. त्यामुळे दावा करणारे केवळ वाचाळवीर आहेत, त्यांचा या घटनेशी दुरान्वये संबंध नाही. आम्हाला सांगण्यात आले होते की, कोणत्याही संघटनेने श्रेय घ्यायचे नाही. ढाचा कुणी पाडला असे विचारल्यानंतर कारसेवकांनी पाडला, असे बोलायचे. हे ठरले होते. आम्ही शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही तसेच उत्तर दिले”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.