Sujay Vikhe-Patil : विधानसभेची निवडणूक तोडांवर आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. तसेच सभा, मेळावे आणि बैठका घेत एक प्रकारे निवडणुकीचा प्रचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातही राजकारण तापलं असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले माजी खासदार सुजय विखे राहता विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

आता माजी खासदार सुजय विखे यांचा राहता मतदारसंघात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. “शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जर कोणीही धर्माच्या आणि जातीच्या नावावर द्वेष पसरवण्याचं काम केलं तर तुमची गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे. मात्र, सुजय विखे यांनी कोणाचंही नाव न घेता हा इशारा दिला असल्यामुळे त्यांनी नेमकं कोणाला इशारा दिला? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा : Jay Pawar : बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचं सूचक विधान; म्हणाले,”अजित पवार…”

सुजय विखे काय म्हणाले?

“असे किती लोक आहेत त्यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कमीत कमी सहा महिने दिसत नाहीत. कोणी दु:खात असतं. कोणी सांयकाळी बसलं की दोन दिवस हटत नाही. शेवटी दु:खामधून बाहेर येण्याचा ज्याचा त्याचा मार्ग असतो. माझा निवडणुकीत पराभव झाला त्यानंतर लगेच दुसऱ्यादिवशी मी इदगाह मैदानावर होतो. शेवटी एवढंच सांगतो की, या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जर कोणीही धर्माच्या आणि जातीच्या नावावर द्वेष पसरवण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे मी आता स्पष्ट सांगतो”, असा इशारा सुजय विखे यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इथं कोणीही असुरक्षित नाही. या ठिकाणी कोणालाही संरक्षण देण्याची गरज नाही. हिंदूंना आणि मुस्लिमांनाही संरक्षणाची गरज नाही. वर्षानुवर्ष आपण एकमेकांबरोबर राहिलो आहोत. मग संरक्षण का पाहिजे? कोणत्या जातीचं काम माणसांची जात विचारून केलं जातं? मात्र, ज्यांना जातीवाद आणि धर्मवाद करायचा असेल त्यांनी मला सांगा. मग आम्हीही सांगू की अर्ज करताना त्या ठिकाणी धर्म लिहा, जात लिहा. तुमच्या मतदारसंघात तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम केलं. पण कधीही जात विचारलेली नाही. पण काहीजण जातीचा द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत”, असा आरोप सुजय विखे यांनी केला.