भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबावर तोफ डागलीय. त्यांनी अजित पवार यांच्यावर बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली असा आरोप केलाय. तसेच शरद पवार यांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल केलाय. तसेच पवार कुटुंबातील कुणीही मी दिलेल्या पुराव्यातील एक कागदपत्र खोटा आहे हे सिद्ध करावं, असं आव्हानही दिलंय. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवार यांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाहीये. माझ्याकडे पुरावे आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?”

“अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?”

“बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का? ते शरद पवार यांना मान्य आहे का?” असा थेट सवाल यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. तसेच “माझं शरद पवार यांना आव्हान आहे की मी हे सर्व आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयाला पण पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत. यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावं,” असं आव्हान किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबाला दिलं.

हेही वाचा : “किरीट सोमय्यांचा हा आरोपही ओम फस्स”, हसन मुश्रीफ यांनी खोचक शब्दांत साधला निशाणा!

किरीट सोमय्या म्हणाले, “मी जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी हे करतोय, पण पवार परिवार महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहे. ते लुटीसाठी करतात, मी ती लूट जनतेसमोर जनतेसाठी ठेवण्यासाठी काम करतो शरद पवार इतके वर्ष मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ११ घोटाळेबाज ठाकरेंचे आता १७ झाले. ६ राखीव झालेत, हे वाढत चालले आहेत. यातील एकही घोटाळ केला नाही असं म्हणण्याची हिंमत ठाकरे-पवारांमध्ये नाही. तुम्ही मंत्री आहात जे घोटाळे केलेत त्यावर बोला ना.”

“पोलीसच माफिया, चोरी करत सुपारी घेतेय, पोलीस आयुक्त गायब, गृहमंत्री फरार”

“हे घोटाळे पोलिसांनी उघड करायला हवे, मात्र हे पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून काम करत आहेत. पोलीसच चोरी करतेय, पोलीसच सुपारी घेतेय, पोलीस आयुक्तच गायब होतो, गृहमंत्री फरार होतो. म्हणून शेवटी जनतेने जायचं कुठं? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, लोकायुक्त, राष्ट्रीय हरित लवाद, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरीट सोमय्या जात आहे तर त्यात चूक काय?” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya ask question to sharad pawar over ajit pawar corruption allegations pbs
First published on: 17-10-2021 at 12:56 IST