राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधात असलेल्या भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कलगीतुरा रंगताना दिसत आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये तर वाद टोकाला गेल्याचं दिसत आहे. अनेक मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी केली आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर किरीट सोमय्या यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावन गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करत आहे. भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचं असं प्रकार आहे. केंद्र सरकारचे ४४ कोटी, स्टेट बँकेचे ११ कोटी रुपये यांनी बालाजी कारखाना बनवला ५५ कोटींमध्ये. आणि स्वत:च्या भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फक्त २५ लाख रुपये देऊन काबीज घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढंच काम करत आहे. भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. मी ईडीच्या या कारवाईचं स्वागत करत आहे.”, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर हल्लाबोल करत एक ट्वीट केलं आहे. ठाकरे सरकारची महान इलेव्हन असं लिहीत त्यांनी ११ जणांची नावं लिहिली आहेत. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे लिहिली आहेत.

याआधीही किरीट सोमैया यांनी ट्वीट करून भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. “खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे ५ वाजता ₹७ कोटी रोख नगदी चोरी?, शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७/७/२०१९ रोजी सकाळी ५ वाजता ₹७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली. एवढी रोख रक्कम आली कुठून?” असा प्रश्न उपस्थित करून ट्वीट केलं होतं.

यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी ५ कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. भावना गवळी विदर्भातील शिवसेनेच्या नेत्या आहेत. आतापर्यंत त्या पाच वेळा यवतमाळ वाशिम मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya on bhavana gawali and uddhav thackeray rmt
First published on: 30-08-2021 at 13:54 IST