करोना टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांवर वाढीव बिलांची वीज कोसळली. लोकांमधील असंतोषाची दखल घेत वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र या सवलतीपोटी राज्य सरकारवर किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतला. त्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती. त्यानंतर आता या वीज बिलांवरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. करोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेल्या ऊर्जामंत्र्यांनी भाजपवर प्रतिहल्ला चढवत, फडणवीस सरकारच्या काळात किमान सरासरी कार्यक्षमता न दाखविल्याने महावितरणची थकबाकी त्या पाच वर्षांत तिपटीने वाढल्याचा आरोप केला. सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष या वादामध्ये आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही उडी घेतली आहे. ट्विटरवरुन सोमय्या यांनी “माझे लाईट बिल माझी जवाबदारी” असं म्हणतं ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो टाकत, “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”, असा टोला लगावला आहे. हे आपल्याला एका पत्रकाराने पाठवल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

याच विषयासंदर्भात गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत विचारमंथन झाले. महावितरणच्या ६७ हजार कोटींच्या थकबाकीने राज्य सरकारची चिंता वाढविली असून, वसुलीसाठी नव्याने मोहीम राबविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांवर पडलेला वाढीव वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी वीज बिलात सवलत देण्यावरून, तसेच मंत्रालयांना निधी मिळत नसल्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने मंत्रिमंडळ बैठकीत मात्र सबुरीची भूमिका घेतली.

आणखी वाचा- “ठाकरे सरकार हे देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी…”; वीज बिलांवरुन भाजपा नेत्याचा हल्लाबोल

..तर महावितरण आर्थिक संकटात

* मंत्रिमंडळात वीजग्राहकांना सवलत देण्यावरून बरीच चर्चा झाली. शेतकरी तसेच सामान्य ग्राहकही वीज बिले भरत नसल्याने महावितरणची थकबाकी तब्बल ६७ हजार कोटींवर गेल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बैठकीत दिली. कंपनीवर दरवर्षी पाच हजार कोटींचा भार वाढत असून अशीच परिस्थिती राहिल्यास महावितरण आर्थिक संकटात येईल.

* गेल्या पाच वर्षांत तत्कालीन सरकारच्या चुकीच्या धोरणाचा हा परिणाम असल्याचा ठपका राऊत यांनी ठेवल्यानंतर अन्य मंत्र्यांनी आपली मते मांडताना, थकबाकी वसुली वाढविण्यावर भर देण्याची गरज बोलून दाखविली.

* शेतकरी थकबाकी भरत नसल्याने त्याचा नाहक भार उद्योगांवर पडतो. त्यामुळे थकबाकी कमी करण्यासाठी पुन्हा एखादी अभय योजना किं वा मोहीम राबवावी. आघाडी सरकारच्या काळात वीज बिल वसुलीसाठी कठोर मोहीम राबविण्यात आली होती. कोणाचीही पर्वा न करता आणि कोणालाही पाठीशी न घालता थकबाकीदारांविरोधात जशी धडक वसुली मोहीम राबविण्यात आली होती, तशीच मोहीम पुन्हा एकदा राबविण्याची आवश्यकता असल्याची भूमिका काही मंत्र्यांनी मांडली.

* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महावितरणच्या वाढत्या थकबाकीवर चिंता व्यक्त करीत ठोस धोरण ठरविण्याची आवश्यकता असल्याची सूचना केली. सुमारे तासभराच्या चर्चेअंती कोणताच निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ऊर्जा विभागाची बैठक येत्या दोन दिवसांत घेऊन ठोस निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya slams thackeray sarkar over electricity bill issue scsg
First published on: 20-11-2020 at 08:26 IST