गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते निलेश राणे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी एक्सवर (ट्विटर) केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. आता पुन्हा एकदा त्यांच्या लोकसभा उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासंदर्भात खुद्द निलेश राणे यांनीच खुलासा केला आहे.
निलेश राणे कोकणातून पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळेच त्यांनी निवृत्तीचा निर्णय रद्द केल्याचंही बोललं जात आहे. त्यादृष्टीने निलेश राणेंनी प्रचार व इतर गोष्टींची तयारी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात स्थानिक राजकीय वातावरण तापू लागलेलं असताना निलेश राणेंनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे उमेदवारीबाबत निलेश राणेंची भूमिका?
आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं निलेश राणेंनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. “मी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही हे स्पष्ट करतो. याआधीही अनेक वेळा स्पष्ट केलं आहे. आज परत करतो. कारण आज एका चॅनलवर ही बातमी मी बघितली. मी सध्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात पक्षाचं काम करतोय. तिथेच काम करत राहणार. धन्यवाद”, असं निलेश राणेंनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर नीलेश राणेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “फडणवीसांशी बोललो, मी आता…”
गेल्या महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी निलेश राणेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही”, अशी पोस्ट केली होती. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यासह निलेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर निलेश राणेंनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता.
निलेश राणे विधानसभा निवडणूक लढवणार?
दरम्यान, खासदारकीच्या शर्यतीत आपण नसल्याचं निलेश राणेंनी स्पष्ट केल्यामुळे आता ते कुडाळ किंवा मालवण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्यासमोर निलेश राणे असा राजकीय सामना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.