माजी मंत्री व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी अलीकडेच राजकारणातून ब्रेक घेतला होता. दोन महिन्यांची सुट्टी घेतल्यानंतर त्यांनी राज्यभर ‘शिवशक्ती परिक्रमा’ सुरू केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या विविध देवस्थानांना भेटी देत आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडखोरीबाबतही पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेण्याच्या निर्णय प्रक्रियेत मी नसल्यामुळे मला या निर्णयाच्या गांभीर्याविषयी जास्त माहीत नाही. पण एकनाथ शिंदे जेव्हा भाजपाबरोबर आले, तेव्हा ती भाजपाची गरज होती, हे स्पष्ट आहे. कारण भाजपाला सरकारमध्ये यायचं होतं.”

हेही वाचा- “…अन् मी एका क्षणात राजकारणात आले”, पंकजा मुंडेंनी सांगितली आठवण; म्हणाल्या, “मस्त एशो-आरामात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण भाजपा सत्तेत असताना आता अजितदादाही सरकारमध्ये सामील झाले. मग त्याच्यामागे काय अजेंडा असू शकतो, हे कदाचित केंद्रीय पातळीवरून सांगता येईल. लोकसभेला विरोधकच नसला पाहिजे, अशी राजकारणाची पद्धत आहे. अजित पवारांना सत्तेत घेण्यामागे तोच प्रयत्न असावा. विरोधक कमजोर व्हावा, तसाच प्रयत्न असेल. पण पुढे काय होईल? हे तुम्हीच पाहा. यावर मी काही सांगू शकत नाही”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.