भाजपासोबतची युती तोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची मोट बांधली. त्यानंतर सत्ता स्थापन करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, शिवसेना पुन्हा परत येईल, ही भाजपाची आशा अजून मावळलेली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तसं बोलून दाखवलं आहे. “शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेनं उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून अडचण नाही,” असं मुनगंटीवार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान केलं. मुनगंटीवार म्हणाले,”शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आताही शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून अडचण नाही. ‘देर आये दुरूस्त आये, सुबह का भूला श्याम को आया’ असं आम्ही समजू,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर “मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. पण, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपाची भूमिका आहे,” असं सांगत त्यांनी मनसेबाबत भाजपाचं मत अनुकूल असल्याचंही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं.

दिल्लीच्या मातोश्री शक्तीशाली झाल्या –

शिवसेना-काँग्रेसच्या आघाडीविषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेनेला काँग्रेसनं पाठिंबा देणं हे २१व्या शतकातील आश्चर्यच आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते सत्तेत गेले. मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

असा इतिहास आहे-

महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. “भिन्न विचारांचे सरकार दीर्घकाळ टिकत नाही, असा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. या सरकारची स्थिती व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासारखी आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader sudhir mungantiwar says we ready for government formation if shivsena gave support bmh
First published on: 30-01-2020 at 08:26 IST