महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेली विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळल्यानंतर भाजप आमदार आशिष देशमुख यांनी राज ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले आहे. मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतो, राज ठाकरे यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी काटोलमध्ये येऊन माझ्याविरुद्ध निवडणुकीत जिंकून दाखवावे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी दुध का दुध आणि पानी का पानी करण्यासाठी काटोलमधून निवडणूक लढवावी. मी विदर्भाच्या बाजूने आणि त्यांनी महाराष्ट्राच्या बाजूने मैदानात उतरावे. त्यानंतर जनताच योग्य ते उत्तर देईल, असे आशिष देशमुख यांनी म्हटले. शिवसेनेत कुचंबणा होत असल्यामुळे राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. तेव्हा दोन मराठी भाऊ वेगळे होत आहेत, याबद्दल काही वाटले नाही का?, असा खोचक सवालही देशमुख यांनी उपस्थित केला.
VIDEO : मनसेने मुंबईतील विदर्भवाद्यांची पत्रकारपरिषद उधळली
मुंबईत काल वैदर्भीय नेत्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबतची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, ही पत्रकार परिषद सुरू असताना मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वाखालील मनसेचे कार्यकर्ते सभागृहात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी सभागृहात दाखल होत अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे विदर्भात अनेक स्तरावरून मनसेचा निषेध करण्यात आला आहे. वेगळ्या राज्याची मागणी करणे हा काही गुन्हा नाही. आम्ही वेगळा देश मागत नाही. विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रत्येकवेळी हुतात्म्यांचे दाखले देण्यात येतात. पश्चिम महाराष्ट्रातील नेते प्रत्येकवेळी विदर्भ विरोधी भूमिका घेताना चुकीची माहिती पसरवतात, असेही देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, गोंधळ घालणे म्हणजे कोणताही पराक्रम गाजवला नसल्याचेही देशमुख यांनी पत्रकातून म्हटले आहे. आमदार आशिष देशमुख यांच्या आव्हानावर मनसेच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मनसेने विदर्भध्वज जाळला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla challenges mns chief raj thackeray to fight election
First published on: 14-09-2016 at 11:51 IST