पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यात आले होते. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना शरद पवार यांनी या मुद्द्यावरून खोचक शब्दांत निशाणा साधत काम झालेलं नसतानाही पुणे मेट्रोचं उद्घाटन होत असल्याची टीका केली होती. तसंच उस्मानाबादमध्ये बोलताना राज्यपालांच्या विधानांचा पुन्हा एकदा समाचार घेतला. दरम्यान पवारांच्या टीकेवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाराजी जाहीर केली असून टीका केली आहे. थोरल्यापणाची मानाची अपेक्षा अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकरांची टीका –

“शरद पवारांचं भाषण ऐकून मी अवाक झालो आहे. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात,” अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

“शरद पवारजी, लोक झोपेत असताना तुम्हीच…”, भाजपाचा खोचक शब्दांत निशाणा; पुणे मेट्रोवरून टोला!

“पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे हताशपणे बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे, की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडवणीस यांच्या नजरेत खुपतात,” अशी टीका पडळकरांनी केली.

“कधीकधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा…”, राज्यपालांच्या विधानावर शरद पवारांचं शरसंधान!

“मी पवार साहेबांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रात २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ असे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात साताऱ्यात पावसात भिजूनसुद्घा फक्त ५४ च आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारणं बंद करा,” असं पडळकर म्हणाले.

“आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या ३० वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं महाकठीण असतं,” असंही ते म्हणाले.

मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन टीका –

शनिवारी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन मेट्रोचं उद्घाटन करत आहेत. कामं होत असतील आणि त्यांचं उद्घाटन होत असेल तर त्यावर तक्रार असण्याचं कारण नाही. ते मेट्रो सुरू करतायत. मला माहिती नाही. महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेलं होतं. पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या रस्त्याने मी देखील गेलो. आमचे काही सहकारी होते. माझ्या लक्षात आलं की हे मेट्रोचं काम काही सगळं झालेलं नाही. मला नुसतं दाखवलं. काम झालं नाही तरी उद्घाटन होत आहे. माझी काही त्याबद्दल तक्रार नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

शरद पवारांची राज्यपालांवर टीका –

“हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरुन कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेऊन कोणी काम करत असेल त्याच्यावर भाष्य न केलेले बरे”, असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी उस्मानाबादमधील पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना पुन्हा राज्यपालांवर निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कधीकधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा पद आणि अधिकार यांचं तारतम्य राहात नाही. महाराष्ट्रात कुणीतरी भाषण केलं की छत्रपती मोठे नव्हतेच, कुणीतरी दुसऱ्यांनीच त्यांना मोठं केलं. त्यांनी सावित्रतीबाई फुलेंबद्दलही भाषण केलं. लोक म्हणाले आता काय करायचं? म्हटलं सोडून द्या ना. काय कुणी विचारणार नाहीये. नको ते बोलल्यानंतर लोक म्हणतात उगीच याच्या नादी लागायला नको. यात काही दम नाही. यात काही अर्थ नाही. याच्याकडून नीट काही बोललं जाणार नाही. म्हणून त्याचा विचार करण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले.